Breaking News

चिरनेरच्या तरुणाला ड्रीम इलेव्हनमध्ये 35 लाखांचे बक्षीस

उरण : वार्ताहर
कुणाचे नशीब कसे खुलेल हे सांगता येत नाही. चिरनेरच्या अशाच एका क्रिकेटवेड्या तरुणाला सध्या सुरू असलेल्या ड्रीम इलेव्हन स्पर्धेने धनवान केले आहे. त्याने लावलेल्या ड्रीम इलेव्हन टीमवर त्याला 35 लाखांची लॉटरी लागली आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेला चिरनेर गावातील श्री महागणपती पंकज ठाकूर या तरुणाला पावला आहे.
ड्रीम इलेव्हन स्पर्धेत उरण तालुक्यातील चिरनेर येथील पंकज संतोष ठाकूर या क्रिकेटप्रेमी तरुणाने स्पर्धेतील नियमानुसार ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका येथील खेळाडू घेऊन ऑनलाईन ड्रीम इलेव्हन टीम तयार करीत स्पर्धेत भाग घेतला. ड्रीम इलेव्हन टीममधील खेळाडू निवड केल्यानुसार त्यांना पॉईंट्स देण्यात येतात. ज्याने योग्य टीम तयार करून त्यातील खेळाडूंना जास्त पॉईंट मिळाले की त्या स्पर्धकाला 100 रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाते. त्यानुसार चिरनेरच्या पंकज संतोष ठाकूरला 35 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
चिरनेर गावातील श्री महागणपती मंदिराचे ट्रस्टी संतोष ठाकूर यांचा पंकज हा मुलगा असून त्याने या अगोदर आपल्या गावाचे नाव युट्यूबच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहचवले आहे. ड्रिम इलेव्हन टीमच्या माध्यमातून 35 लाखांचे पारितोषिक मिळाल्याने पंकजचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सर्वसामान्य घरातील असलेल्या पंकजने या पैशांचा योग्य विनियोग करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यापूर्वी चिरनेर गावातील संकेत विजय मुंबईकर या तरुणाला ड्रिम इलेव्हन टीमच्या माध्यमातून 15 लाखांचे बक्षीस मिळाले होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply