मुंबईतील किमान चार प्रभागांमध्ये अचानक कोरोना केसेसची संख्या काहिशी वेगाने वाढताना दिसते आहे. उपनगरी रेल्वेगाड्या सुरू केल्यामुळे साथ पुन्हा पसरू लागल्याची शंका निर्माण झाली आहे. परंतु त्यात तितकेसे तथ्य नाही. मुंबईसोबतच विदर्भातही काहीठिकाणी कोरोनाचे रुग्ण पुन्हा सापडू लागले आहेत. हे सारे घडते आहे आपल्याच हलगर्जीपणामुळे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
जनजीवन उद्ध्वस्त करणारे चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर झालेल्या वाताहातीकडे पाहात पुन्हा उभे राहण्याची शर्थ करीत असताना नव्या वादळाची चाहुल लागावी तसे काहिसे सध्या झाले आहे. कोरोना विषाणूची पहिली केस देशात नोंदली गेली त्याला एव्हाना एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्येच कोरोनाच्या केसेस देशभरात आढळू लागल्या होत्या. त्याच सुमारास चीनमध्ये हाहाकार उडाला होता. चीनमधल्या वुहान येथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा घातक विषाणू निसटला आणि पुढे तो जगभर पसरला असेच अजुनही मानले जाते. 137 कोटी इतकी अफाट लोकसंख्या असलेला भारत देश या संकटातून कसा वाचणार असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेपासून सर्व तज्ज्ञ मंडळींना तेव्हा पडला होता. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये धड आरोग्य व्यवस्था नाही, लोकसंख्येची घनता देखील प्रचंड असल्याने विषाणूच्या संसर्गाला रोखता येणे अशक्य होईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेला देखील वाटली होती. आंतरराष्ट्रीय वैद्यक तज्ज्ञांचा भारताबद्दलचा हा समज देखील खोटा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 137 कोटी लोकसंख्येच्या भारताने कोरोनाच्या साथीशी शर्थीने झुंज दिली आणि तिला नमविले देखील. इतकेच नव्हे तर, कोरोना विषाणूचा नायनाट करणार्या प्रतिबंधक लसींच्या उत्पादनात भारताने आघाडी घेतली. आज भारतात निर्माण झालेली कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देश अक्षरश: धडपड करत आहेत. कोरोनाचे संकट भारताने यशस्वीरित्या परतवले असे वाटू लागले असतानाच या घातक विषाणूने अचानक पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील कोरोना विषाणूने आपले स्वरुप बदलून नव्याने हातपाय पसरावयास सुरूवात केली. कोरोना विषाणूचे हे नवे प्रकार भारतात देखील शिरल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी केरळ आणि महाराष्ट्रात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. मुंबईत देखील ही साथ बरीचशी आटोक्यात आली होती. किंबहुना, अजुनही ती नियंत्रणातच आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये एकट्या मुंबईत मास्क न लावणार्या मंडळींकडून काही कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही आजही रस्त्यावर बिनदिक्कत विनामास्क फिरणारे बेजबाबदार नागरिक सहज दृष्टीस पडतात. एकेकाळी न चुकता खिशात छोटीशी सॅनिटाइझरची बाटली घेणारे कित्येक जण आता सारे काही विसरून कोरोनापूर्व काळासारखे वागू लागले आहेत. दो गज की दूरी हे वचन तर अनेक लोक विसरलेच आहेत. अशा बेजबाबदार वर्तनामुळे कोरोनाचा विषाणू पुन्हा डोके वर काढू लागला आहे. असेच चालू राहिले तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी उघडपणे दिले आहेत. पुन्हा तशी वेळ आली तर त्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहू शकणार नाही हे सरकारनेही लक्षात ठेवावे आणि नागरिकांनीही.