नवी मुंबई : बातमीदार
महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी महापालिकेने जागा द्यावी, अशी मागणी भाजप कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ यांनी आयुक्तांकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या सर्व परिस्थितीत समाजातील कष्टकरी महिला, माता, भगिनी पुन्हा एकदा नव्याने कुटूंबाची आर्थिक घडी बसवण्यासाठी विविध वस्तू, कंदील, खाद्यपदार्थ हे घरात बनवून विकणे असा स्वयंरोजगार करत आहेत. परंतु या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ इ. विक्रीसाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. जर या महिलांना त्यांनी स्वयंरोजगार संकल्पनेतून बनवलेले साहित्य, वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठराविक कालावधी साठी जागा उपलब्ध झाली तर या महिलांना मोलाची मदत होऊ शकेल. या विषया संदर्भात भाजप कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना स्वयंसिद्धा महिलांना आपण त्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरूपात ठराविक कालावधीसाठी जागा उपलब्ध करून त्यांना मदत करावी व त्यांना आधार द्यावा, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी तालुका महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती हलीगौडा, महिला मोर्चा सरचिटणीस विजया जाधव, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष सोपान बैलकर उपस्थित होते.