Breaking News

कोकणची लाइफलाइन होतेय पोलादपूरमध्ये अंडरपास

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66वर पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यालगत चौपदरीकरणादरम्यान कोकणाची लाइफलाइन असलेला राष्ट्रीय महामार्ग अंडरपास होत असताना शहराच्या भविष्याचे संकेत देत आहे, मात्र राजकीय पक्ष आताही पोलादपूर नगपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मश्गुल झालेले दिसून येत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता मिळाली. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जनसुनावणी टाळली गेल्याने स्थानिक जनता या चौपदरीकरणाबाबत अंधारात राहणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले. भूसंपादनास विरोध न झाल्यास पाचपटीने मोबदला देण्याची भूमिका केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली. यानंतर या पत्रकार संघटनांचे नेतृत्व करणार्‍या संघटनेने चौपदरीकरणासाठी ज्यांच्या जमिनी, घरे अथवा शेतीचे भूसंपादन होऊन राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण होतेय, त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याला विषयांतर मानले. यामुळे या आंदोलनांसाठी आग्रही असलेल्या कोकणातील पत्रकारांना एकत्र करणार्‍या पत्रकाराने पोलादपूर तालुक्यापुरता स्थानिक बाधितांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी संघटना तयार करून प्रयत्न केला, मात्र यानंतर या पत्रकाराला एकाकी पाडण्यासाठी नेतृत्व करणार्‍या संघटनेने खोगीरभरती करून पोलादपूर तालुक्यातील बाधितांच्या संघटनेतील झारीतील शुक्राचार्यांना साथ देण्याचा सपाटा लावला.

याचदरम्यान, एकीकडे भूसंपादनाचा मोबदला वाटपाची प्रक्रिया, तर दुसरीकडे पोलादपूर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. या दोन्ही प्रक्रियांदरम्यान बाधितांनी मोबदला मिळविण्याकडे लक्ष दिले, तर राजकीय पक्षांनी चौपदरीकरणाच्या भवितव्यातील परिणामांपेक्षा बाधितांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकीय भवितव्याला प्राधान्य दिले. यानंतर चौपदरीकरण कसे होणार, शहरातील चौपदरीकरणाला आवश्यक 60 मीटर भूसंपादन कसे होणार, चौपदरीकरणानंतर पोलादपूरची ओळख असलेले एसटी बसस्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या दोन्हींबाबत विवादाची परिस्थिती दिसून आली. या वेळी चौपदरीकरणादरम्यान, पोलादपूर एसटी बसस्थानकाची जमीन खासगी मालकीची असल्याने तेथे भूसंपादन करण्यास आक्षेप घेऊन तसा निर्णय घेण्यात या जमीनमालकांचा नातू यशस्वी झाला. त्यामुळे मोबदला प्रक्रियेमध्ये त्यांचा अथवा एसटी महामंडळाचा समावेश टळून एसटी स्थानकाने अद्याप ओळख टिकवून ठेवली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाबाबतही एका संघटनेची सक्रियता दिसून येऊ लागली आहे, मात्र या दोन्ही महत्त्वाच्या ओळखींखेरीज, अनेक व्यक्तींना त्यांची दुकाने अथवा व्यवसायांची ओळख टिकविण्याची मानसिकता दिसून आल्याने चौपदरीकरणाला आवश्यक 60 मीटर भूसंपादनाऐवजी 45 मीटर भूसंपादनाची मानसिकता वाढीस लागली आणि यामुळे पोलादपूर शहरातील भूसंपादनास विरोध न झाल्यास पाच पटीने मोबदला मिळण्याची शक्यता दुरावली. यासोबतच, संपादित 45 मीटर जमिनीचा योग्य विनियोग करून पोलादपूर शहरासाठी चौपदरीकरणाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागावर आल्याने पोलादपूर शहरातील कोकणाची लाइफलाइन चक्क बॉक्स कटींग करून अंडरपास पद्धतीने दृष्टीआड होण्याची परिस्थिती निर्माण झाली.

पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ देवस्थानापासून शून्य खोली सुरू होऊन काटेतळी-सडवली फाट्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग अंडरपास म्हणजे भूमिगत होतानाचे दृश्य म्हणजे ज्यांनी 60 मीटर भूसंपादनास विरोध दर्शविला त्यांच्या उर्वरित जागेमधून हा राष्ट्रीय महामार्ग दृष्टीसही पडणार नाही, इतक्या खोल असणार आहे. सद्यस्थितीत पोलादपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याजवळ अंडरपास रस्त्याचे भूमिगत झालेले स्वरूप दिसून येईल, असा रस्ता खोदून तयार केलेला बॉक्स दृष्टीपथात येण्याइतपत बांधकाम दिसून येत आहे. पोलादपूर एसटी स्थानकामध्ये बस येण्यासाठी ज्या सर्व्हीस रोडची गरज आहे, त्याच सर्व्हीस रोडवरून स्थानकाबाहेर आल्यानंतर गाड्यांना महाबळेश्वर, गोवा अथवा मुंबईकडे जाण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळापरिसरात कशारितीने रस्ता तयार होणार याबाबत उत्सुकता असली तरी अंडरपास झालेल्या लाइफलाइनमुळे पोलादपूर शहराच्या भवितव्याबाबत कोणीही गांभिर्याने विचार करताना दिसून येत नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी पोलादपूर नगरपंचायतीने शहररचना आराखड्याबाबत सूचना व हरकती देण्यासंदर्भात नोटीस प्रसिद्ध केली आहे. पोलादपूर शहराचा चेहरा भूसंपादन आणि चौपदरीकरणानंतर कसा असावा याबाबत नगरपंचायतीचे कोणतेही मत अथवा हस्तक्षेपाचे स्वरूप महामार्गाच्या दूतर्फा असलेल्या पोलादपूरचे भविष्यातील नगरनियोजन करताना दिसून येत नसल्याबद्दल दूसरी पंचवार्षिक निवडणूक लढवू पाहणार्‍या कोणत्याही राजकीय पक्षाला आश्चर्य वाटलेले दिसून येत नाही. पोलादपूरमधील नागरिकांनाही  शहराच्या बदलत्या स्वरूपामुळे शहराच्या विकासाला सरळछेद बसणार असल्याचा खेद दिसून येत नाही.

सद्यस्थितीत पोलादपूर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनही ती कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर अद्याप निर्णायक स्थितीत आलेली नाही. या अवधीमध्ये राजकीय पक्षांप्रमाणे नागरिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मश्गूल राहिल्यास पोलादपूर शहराचे भवितव्य अंधारात जाण्याची परिस्थिती दिसून येत आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply