सह्यादीच्या विस्तीर्ण रांगामध्ये अनेक दुर्मिळ, दुर्लभ रानवनस्पती असतील, त्यांची नावे आपल्याला माहीतही नसतील… अरबी समुद्राच्या अथांग खोलीत अनेक माणिक-मोती शिंपल्यामधून दडले असतील, पण त्यांची योग्यता कुठेही कमी पडत नाही… त्यांचे संजीवन, वलयांकित तेज केव्हा न केव्हा आपणास भारावून सोडते, दीपवून अन व्यापून टाकते. असेच एक हृदयांकित व्यक्तिमत्व म्हणजे सांगीतिक वाद्यांच्या विविध क्षेत्रांत अष्टपैलूत्व सिद्ध करणारे संगीत संयोजक व वादक मंदार महामुणकर.
रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्रीच्या तीरावर ग्रामदेवता आई जनाईच्या मांगल्याने सजलेल्या, नटलेल्या पडवे गावाचे सुनील महामुणकर व वैभवी महामुणकर या दाम्पत्यापोटी मंदारचा जन्म झाला. ज्येष्ठ निरूपणकार डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकरूपी संस्कारांनी प्रेरित असणारे आई-वडील दोघेही नोकरदार, कधी रायगडमधील गोरेगाव, तर कधी मुंबई अशी फिरती असायची. सुरुवातीला संगीत क्षेत्रात मिरा-भाईंदर येथे वयाच्या आठव्या वर्षापासून आद्यगुरू पाबळकर गुरूजी यांच्याकडे मंदारचा तबल्याचा श्रीगणेशा झाला. तबल्याचे बाळकडू आजी (कै.) सुनिला महामुणकर या स्वत: मंदारला कडेवर घेऊन गुरूजींकडे तबल्याच्या दिक्षेसाठी जात असत. सात वर्षे गुरुजींकडे तालीम घेतली व ती तालीम घेत असताना मिरा-भाईदर महापालिकेत वादन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मंदारला मिळाले. तिथेच या उद्योन्मुख तबला वादकाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली. यानंतर त्याने अविरतपणे सांगीतिक तपःचर्येला त्याची सुरुवात झाली.
रायगडमधील गोरेगावमध्ये सातवी ते महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानादेखील मुंबईत संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. सध्या त्याचे साईनाथ म्हात्रे यांच्याकडून तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण सातत्यपूर्ण सुरू आहे. विष्णू म्हात्रे यांच्या माध्यमातून पखवाज या वाद्यात पारंगतता मिळविण्याचा प्रयत्न केला, तर साईनाथ यांच्या सुचनेनुसार मुंबईत राजेंद्र साळवी यांच्याकडे गेल्या 11 वर्षांपासून ढोलकीचा बाज अंगीकृत करण्याचा सराव सुरू आहे. ’मेहंदीच्या पानावर’ ही गानमालिका गाजविणारे व उत्कृष्ट ढोलक वादक करीमबाबा यांचे शिष्य मधू बने (मुंबई) यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून ढोलक या वाद्यप्रकारवर मंदारचा रियाज चालू आहे. सध्याच्या आधुनिक युगात ’हेण्डसॉनिक’ हे इलेक्ट्रॉनिक वाद्य भारतात आल्यावर त्याचे मार्गदर्शन नाशिकमधील स्वरंजय धुमाळ यांच्याकडे तो घेत आहे.
एवढ्या व्यापातून मंदारने शिक्षणाची कास सोडली नाही. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना 2015मध्ये पुणे गायन समाज या संस्थेकडून तबला विशारद पदवी संपादन केली. बीएस्सी बीएड करून मुंबईमध्ये सेव्हन स्केअर अकॅडमीक, मिरा रोड या सीबीएसई बोर्डच्या विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून तो कार्यरत आहे. राजेंद्र साळवी यांच्या मार्गदर्शनातून दिमडी, बघलबच्चा, संबळ, ढोल यांसारख्या पारंपरिक वाद्यांमध्ये झालेली प्रगती त्यास लौकिकाला साजेशी आहे. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील हा होतकरू तरुण सध्या मुंबईतही आपला नावलौकिक करीत आहे.
देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे… घेता-घेता देणार्याचे हात घ्यावे…
या कवी करंदीकरांच्या ओळीप्रमाणे मंदार महामुणकर याने मिळालेले सांगीतिक ज्ञान तो आपल्या खासगी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना देत असून, त्याने बालसंगीतप्रेमी शिष्यांची फळी निर्माण केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस विभागातून झालेल्या युथ फेस्टिव्हल उत्कर्ष 2014 या स्पर्धेत त्याला रायगड जिल्ह्यातून व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सध्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम सुरू असून, अक्षय भगत प्रोडक्शन निर्मित तेजस पवार यांच्या संगीत संयोजनाखाली वेडे मन व विठू माऊली या गाण्यांसाठी मंदारने तबल्याची साथ चढविली. हयातील वेडे मन हे गाणे हिंदुस्थान टाईम्समध्ये नॉमिनेट झाले, तसेच महाड-माणगाव-पोलादपूर या मतदारसंघातील सी.एम.चषक, मीरा-भाईदरमधील स्वस्तिक वेल्फेअर असोसिएशन… इकोफ्रेंडली गणरायाचे कार्यक्रम, शूरा मी वंदिले निजामपूर-माणगाव अशा विविध कार्यक्रमातून संगीत संयोजक ते तबल्याची, तसेच विविध वाद्यांची जबाबदारी सहजरित्या व उत्कृष्टपणे त्याने बजावली.
मंदारने संगीत क्षेत्रात भरारी घेतली, यामागे त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवार, शिक्षक यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले. त्याच्या वयाची मुले डॉक्टर, इंजिनियर होत असताना आपल्या मुलाने संगीतातच आपले पाय घट्ट रोवून उभे राहावे यासाठी दिलेले मानसिक, आर्थिक आधार मंदारला मोलाचा वाटतो. बहिणी धनश्री, यामिनी तसेच भावीजोडीदार अमृता पोटसुरे या ठामपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. श्री. डांगे, श्री. सचिन गोरेगावकर, श्री. चेरफळे यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. मित्रांच्या साथीने, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा अनेक हितचिंतकांच्या शुभाशीर्वादाने मंदारने उज्ज्वल यश मिळविले. रायगड, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातून लोकसंगीत, सुगम संगीत या कार्यक्रमातून तबल्याच्या व ढोलकीच्या जादूची पखरण करून आपल्या अदाकारीचा नवा आयाम त्याने निर्माण केला आहे.
Check Also
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …