Breaking News

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार या चित्रपटावर व्यक्त होत आहेत. मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत अनेक जण या चित्रपटावर व्यक्त होत आहेत, लिहीत आहेत, बोलत आहेत. अनेकांना या चित्रपटावर भरभरून बोलायचंय. सोशल मीडियात मल्टीप्लेक्समधील या चित्रपटाला मिळत
असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची काही सेकंदाची रिळ पाह्यला मिळताहेत. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचलाय हे त्यात दिसून येतेय.
छावा चित्रपट आता केवळ पडद्यावर राहिला नसून तो जनसामान्यांनी आपलासा केला आहे. एखादा आवडलेला चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतात म्हणजे काय असते याचे उत्तर या चित्रपटाला रसिकांनी आपलेसे केले हे आहे.
‘छावा’चा ट्रेलर लॉन्च सोहळा दादर या मुंबईतील मध्यवर्ती भागातील पारंपरिक अशा प्लाझा थिएटरवर ढोल ताशांच्या गजरात केला याच क्षणापासून त्याचा पूर्वप्रसिद्धीचा फोकस अतिशय उत्तम आहे हे अधोरेखित झाले. आज अनेक चित्रपटांचे ट्रेलर लॉन्च सोहळे मल्टीप्लेक्समध्ये होतात. त्याच रूळलेल्या व्यावसायिक वाटेवरून न जाता शिवाजी पार्कच्या परिसरातील आणि महाराष्ट्रीय ठसा उमटलेल्या वातावरणातील प्लाझाची निवड करून प्रेक्षकांशी चित्रपट जोडला जाण्यात महत्त्वाची भूमिका वठवली. या वेळचा विकी कौशलचा आत्मविश्वासपूर्ण वावर आणि व्हीलचेअरवर आलेल्या रश्मिका मंधानाचा उत्साह या गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरल्या.
आणि याचेच पुढचं पाऊल पडले ते दादरच्याच पूर्व भागातील पारंपरिक अशाच चित्रा चित्रपटगृहात! तेथे या चित्रपटाच्या आगाऊ तिकीट विक्रीची सुरुवात झाल्याची घोषणा करतानाच चित्रा चित्रपटगृहाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून विकी कौशल व रश्मिका मंधाना प्रसारमाध्यमे आणि प्रेक्षकांच्या उत्फूर्त गर्दीला सामोरे गेले. आपल्या या इव्हेन्टसमध्ये त्यांनी जनसामान्यांना सहभागी करून घेतले ही अतिशय उत्तम गोष्ट आणि यात आणखी एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, चित्रा चित्रपटगृहावरचा ‘छावा’चा भव्य दिमाखदार लक्षवेधक असा कटआऊट्स. त्यात छावा चित्रपटाचे मोठेपण दिसून येत होते आणि या सोहळ्याच्या सर्वच माध्यमातून हे कटआऊट्स सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचले.
मला तर हे कटआऊट्स पाहताना सीमा देव निर्मित व राजदत्त दिग्दर्शित सर्जा (1988)च्या वेळेस प्लाझा चित्रपटगृहावरचे असेच भव्य दिमाखदार कटआऊट्स आठवले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज (ही भूमिका रवींद्र महाजनी यांनी साकारली), त्यांचा मावळा सर्जा (अजिंक्य देव) आणि भली मोठी तोफ होती. हे भव्य डेकोरेशन अथवा कटआऊट्स पाहूनच सर्जा चित्रपट आपण पाह्यला हवा असे वाटणे स्वाभाविक होतेच. पूजा पवारचा हा पहिलाच चित्रपट. तिचंही चित्रपटातील रूप प्लाझा चित्रपटगृहावर होते.
चित्रपटगृहावरच्या अशा कटआऊट्सची परंपरा खूपच मोठी. त्याची जास्त चर्चा बाहुबली (2014)सारखे भव्य दिव्य चित्रपट प्रदर्शित होताना होत गेली. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीसह दक्षिणेकडील अन्य भाषेत डब होऊन अतिशय थाटात प्रदर्शित होत जाताना दक्षिणेकडील चित्रपटगृहावरील भव्य दिमाखदार कटआऊट्स संस्कृती आपल्याकडे रूजू लागली.
प्रशांत नील दिग्दर्शित ’सालार’ (2023)चं प्रभासचं मुंबईतील काही मल्टिप्लेक्सवर अबब म्हणावं असं 120 फूटाचं लागलेल्या भव्य दिमाखदार कटआऊटस्चीही बरीच चर्चा रंगली.
थिएटरपेक्षा भली मोठी उंच कटआऊट्स हे दक्षिणेकडील भन्नाट कल्चर आपल्याकडे तसं नवीन नाही तर साठच्या दशकापासूनच आहे हे सांगितल्याने तुम्ही नक्कीच सुखावाल. मल्टिप्लेक्स युगात ते काहीसं हरवलं होतं. रजनीकांतचा पिक्चर आला रे आला की सायन माटुंगा परिसरातील सिंगल स्क्रीन थिएटर (विशेषतः अरोरा) आणि मल्टिप्लेक्सवर ते दिसे. शुक्रवारी भल्या पहाटे फर्स्ट शोलाच चाहत्यांकडून या कटआऊटस्ना दुधाने आंघोळ घालून आनंद साजरा होई. पिक्चरवरचं जनसामान्यांचे बेहद्द प्रेम प्रेम प्रेम म्हणतात ते हेच.
पुष्पा, आरआरआर, केजीएफ, बाहुबली 2, कांतारा, पुष्पा 2 या दक्षिणेकडील चित्रपटांनी ’भव्य दिमाखदार थिएटर डेकोरेशन कल्चर’ छान स्थिरावलं. ’निमल’, पुष्पा 2च्या खणखणीत यशाने हे डेकोरेशन आता जणू आवश्यक झालं. (अशा भव्य दिमाखदार डेकोरेशन वा कटआऊटस्चा खर्च चित्रपटाच्या बजेटचाच एक भाग). शाहरूख खानच्या राजकुमार हीरानी दिग्दर्शित ’डंकी’चा शाहरूख खानही असाच मल्टिप्लेक्स उंचीच्या कटआऊट्सने लक्ष वेधून घेतले. अशी भली मोठी कटआऊट्स लावून नव्हे, थीममध्ये धमक (अथवा दम) असेल तरच पिक्चर चालतोच असंही कोणी यावरून वाटलं.
हिंदी चित्रपटासाठी अशी भली मोठी उत्तुंग कटआऊट्स पूर्वीही लागत. ती पाह्यला गर्दीही होई. त्यावरून पिक्चरबद्दल उत्सुकता वाढे.
अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची रचना भव्य डेकोरेशन आणि आकर्षक कटआऊट्स यांना भारी स्कोप देणारी. फरक इतकाच की, त्या काळातील कटआऊट्स थिएटर्सपेक्षाही उंच नसत. खासकरून दक्षिण मुंबईतील अशा थिएटर्सच्या फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला न्यायलाच हवे. गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमाला श्रीकृष्ण लीला, बलराम श्रीकृष्ण अशा पौराणिक चित्रपटासाठी कटआऊट्स अशी नि इतकी डेकोरेटीव्ह की त्यांनाही भक्तीभावाने हात जोडावेसे वाटे. रॉक्सी आणि राजेश खन्ना हे एकदमच हिट आणि फिट्ट समीकरण. आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, रेड रोझ या फिल्मचे डेकोरेशन पाहण्यातही एक वेगळीच मौज असे. ऑपेरा हाऊस तर एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत फुल्ल डेकोरेशन आणि मधोमध एक कटआऊट्स.
’अमर अकबर अ‍ॅन्थनी’च्या वेळेस मधोमध अमिताभचे अ‍ॅन्थनी गोन्सालवीसचं रूपडं. लक्षात राहिलीत अशी कटआऊट्स हो. पिक्चर फक्त पडद्यावर दिसतो असे नाही. तो असावी अनेक माध्यमातून दिसत असतो. इम्पिरियलवरही असाच फंडा. ’दुनिया का मेला’मधील रेखाच्या क्लब डान्सचा देखावा, ’अंधा कानून’चा अमिताभ हे पलिकडच्या फूटपाथवर जाऊन बघण्याचा मोह होणारच. नाझवरचा ’यांदो की बारात’चा चाकूधारी धर्मेंद्र जणू त्याची मॅनची इमेज बळकट करणारा. पिक्चरने पन्नास आठवड्यांचा मुक्काम करताना सतत हा ’सूडनायक’ धर्मेंद्र डोळ्यासमोर राहिला. ऊन, पाऊस, थंडीत हे कटआऊट्स तसेच उभे राहत. मिनर्व्हावरचे डेकोरेशन हा एक स्वतंत्र रंजक विषय. एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत ते असे आणि अगदी मधोमध एक कटआऊट्स असे. ते त्या चित्रपटाचे ओळख करून देई. चित्रपट संस्कृतीतील कल्पकता ही अशी केवढी तरी व बहुस्तरीय. ‘दीवार’चा 786चा बिल्ला लावलेला आणि नजरेत बेफिकीरी असलेल्या निळ्या रंगातील शर्टाला गाठ घालून उभा असलेला विजय, शोलेच्या गब्बरसिंगने ठाकूरला ताकदीने पकडलंय, ’शान’चा डेंजरस शाकाल, ’राम तेरी गंगा मैली’ची धबधब्याखालील ओलेती गंगा ही कटआऊटस गाजली. मराठा मंदिर चित्रपटगृहावरचे ’मुगल-ए-आझम’चे डेकोरेशन पाह्यलाही सतत गर्दी होई. पिक्चर हाऊसफुल्ल गर्दीत चालतोय, आपण नंतर बघूच तोपर्यंत हे कटआऊट्स मनात घर करून घे अशी ती भावना असे. एखाद्या महान कलाकृतीच्या मेकिंगचा प्रवास असा रसिकांच्या प्रतिसादातून पुढे सुरू असतो. त्याच्या आठवणीच्या रूपाने तो पुढे कायम राहतो. ’रझिया सुल्तान’च्या फ्लॉपची कायमच चर्चा रंगते, पण मराठा मंदिरवरचा गरुडाचा कटआऊटस पुन्हा पुन्हा पाहण्यासारखा. अपयशी चित्रपटही कोरा कागद नसतो. त्याचही काही तरी वैशिष्ट्य असतेच. अलंकार थिएटरवरचा झुंबराला लटकलेल्या ’जुगनू’चा कटआऊटस एकीकडे खेतवाडीकडून तर दुसरीकडेच भेंडी बाजारकडून लक्ष वेधून घेई. आज यातील अनेक जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड गेलीत, पण त्यावरचे डेकोरेशन, काही कटआऊटस मात्र जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांच्या मनात घर करुन आहेत हे आवर्जून सांगायलाच हवे.
आठवणीच्या फेरफटक्यातील ही काही उदाहरणे. चित्रपटाच्या इतिहासात थिएटर डेकोरेशन, कटआऊटस यांचे स्थान खूपच महत्त्वाचे. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे. मल्टिप्लेक्स युगात ते काहीसं हरवले. सिंगल स्क्रीन थिएटर्स एकेक करत बंद होताना हा सगळा आठवणीतील ठेवा झाला, मात्र दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने ती वेधक परंपरा जपली. थिएटर्स झालेच, लहान मोठ्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी आपल्या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची नि स्टार्सची कटआऊटस लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरताहेत. आपला चित्रपट आणि आपले स्टार आपणच मोठे करायला हवेत अशी तेथील चित्रपटसृष्टीची भावना आहे आणि याच डेकोरेशन, कटआऊटस कल्चरला आपणच दाद द्यायला हवी असा चित्रपटवेड्यांचा दृष्टिकोन आहे.
साऊथचे हे कल्चर आता हिंदीत जम बसवतेय तरी ते मूळ हिंदीचेच. चित्रपटाचा इतिहास असा घडत असतो… चित्रपटाचा इतिहास चित्रपट स्टुडिओपासून चित्रपटगृह संस्कृतीपर्यंत व्यापक असा. अनेक कला व तंत्रज्ञान यांची केमिस्ट्री म्हणजे चित्रपट माध्यम आणि विविध माध्यमांतून तोच चित्रपट जनसामान्यांपर्यंत पोहचवणे म्हणजेच चित्रपट व्यवसाय. अतिशय व्यापक असाच हा विषय.
प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहचण्याच्या संस्कृतीतील एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, चित्रपटगृहावरचे कट आऊट! सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह काळातील या गोष्टीने मल्टीप्लेक्स युगापर्यंत प्रगती केली आहे. चित्रपटगृहावर गेल्यावर त्या चित्रपटाचा फिल यायलाच हवा आणि त्यातील एक फंडा हे कटआऊट आहेत.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा रसिकप्रिय चित्रपट तीच लक्षवेधक परंपरा पुढे नेत आहे. ‘छावा’च्या विषयापासून, पटकथा व संवादापासून विकी कौशल, रश्मिकाच्या निवडीबद्दल आणि सेन्सॉरने काही संवादावर घेतलेल्या आक्षेपापासून त्यातील अतिशय उत्तम व प्रभावी अशा आशयापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा होत असतानाच त्यात एक पैलू भव्य दिमाखदार कटआऊटसचाही निश्चित आहे.

  • दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

निकृष्ट दर्जाची विकासकामे करणार्‍या मेसर्स डी.बी. इन्फ्रावर कारवाई करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीत निकृष्ट दर्जाची विकासकामे करणार्‍या मेसर्स डी.बी.इन्फ्रा या ठेकेदारावर कारवाई …

Leave a Reply