कोकणात अशक्य वाटणार्या दर्याखोर्यातून कोकण रेल्वे धावली. कोकण विकासाला गती यातून काही प्रमाणात मिळाली, पण कोकण रेल्वेचा म्हणावा तसा उपयोग कोकणी माणसाला झाला नाही. कोकण रेल्वेमार्गावरून केरळ व अन्य ठिकाणी जाणार्या गाड्या या मार्गावरून अधिक धावतात. कोकणातील प्रवाशाांकडून गाड्यांची मागणी केली जाते, पण त्या सुरू केल्या जात नाहीत. आता कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांचे रुपडे बदलण्यात आले आहे.
बाह्यरंगांवरून चकाचक दिसणार्या या गाड्यांमधील समस्या मात्र तशाच आहेत, अशी आजघडीला स्थिती आहे. त्यामुळे समस्यांनी भरून वाहणार्या या गाड्या म्हणजे केवळ रुपडे बदलले, पण समस्या तशाच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरे मार्गावरून धावणार्या या गाड्यांचा कोकणी जनतेला फायदा कमीच होत आहे. या मार्गावरून धावणार्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीला कायमच वर्दळ असते. कोकणची कन्या म्हणून ओळख असणार्या या गाडीचा इतर राज्यातील प्रवाशांनाच अधिक फायदा होत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरून मुंबई ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणार्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या सुरुवातीपासून प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या दोन्ही गाड्यांचे रुपडे आता बदलण्यात आले आहे. आधी या गाड्यांना आयसीएफ कोच होते. आता नव्या स्वरूपात या दोन्ही गाड्यांना अधिक लांबीचे व अधिक प्रवासी क्षमता
असलेले एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. या एलएचबी कोचमध्ये एलईडी दिवे, हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बर्स, डिस्क बे्रक प्रणाली, उत्तम सस्पेंशन या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या गाड्यांचे रुपडे बदलण्यात आले असले तरी या गाड्यांमधील समस्या तशाच आहेत. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या गाड्यांपेक्षा ’जुनं तेच सोनं‘ असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतून प्रवास करताना जनरल डब्याचे तिकीट घेणारे प्रवासी आरक्षित डब्यांतूनच प्रवास करतात. या प्रवाशांमुळे जादा पैसे मोजून सुखाने प्रवास करणार्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. या डब्यातील तिकीट
तपासनीसदेखील काही करू शकत नाहीत, हे दुर्दैव.
गाडीतील पंख्यांची अवस्था इतकी बिकट आहे की बहुतांशी पंखे बंदावस्थेतच असतात. जे सुरू असतात, त्या पंख्यांची हवाच प्रवाशांना लागत नाही. शौचालयातील दिवे तर पूर्णत: बंदावस्थेत असतात तसेच शौचालयात पाणीच नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ही गाडी प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की कोकण रेल्वेच्या देखाव्यासाठी, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. गाडीतील या समस्यांमुळे जुन्याच गाड्या बर्या होत्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या गाडीतील प्रवाशांमधून या समस्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
गाडीची प्रवासी क्षमता वाढवताना गाड्यांच्या बोगींची संख्या पूर्वीच्या 24वरून आता 22 करण्यात आली. जनरल डब्यांची संख्या कमी केल्याने प्रवासी थेट आरक्षित डब्यात शिरतात. त्यामुळे वादाचे प्रसंगही निर्माण होतात. गाडीत अनेक सुविधा देण्यात आल्या. आरक्षित डब्यात मोबाईल चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली, पण त्यासाठी ठेवण्यात
आलेले स्वीच बंदावस्थेतच आहेत. त्यामुळे चार्जिंग करायचे कसे याबाबत तिकीट तपासनीसांना विचारले असता गाडी नवीनच आहे, असे कसे होऊ शकते, असे आश्चर्यकारक उत्तर देतात.
-योगेश बांडागळे