शेअर बाजाराच्या चढउतारांचा त्रास करून न घेण्याचा एक मार्ग म्हणजे मक्तेदारी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. भारतीय बाजारपेठेत वर्षानुवर्षे मक्तेदारी प्रस्थापित केलेल्या अशा काही कंपन्या.
काही नावंच अशी असतात की त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीबाबत विशेष काहीच सांगावं लागत नाही. उदा. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सम्राट पेले आणि अनेक दिग्गज. अशाच काही कंपन्यादेखील आहेत ज्यांचा वाटा या देशाच्या उभारणीत मोलाचा आहे. फक्त कमी काळात जास्त परतावा, या समीकरणात आपलं अशा कंपन्यांशी विलगीकरण होतंय हे मात्र नक्की. प्रदीर्घकाळासाठी गुंतवणूक म्हटलं की ती उत्तमच कंपन्यांमध्येच असायला पाहिजे असा अट्टाहास हवाच, अन्यथा त्याला जुगार म्हटलं जाऊ शकतं. तर पाहूयात अशा कंपन्या ज्या कदाचित आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसतील, परंतु त्यांचा आपल्या जीवनावरील ठसा कायम आहे. वर उल्लेखलेल्या दिग्गजांची नावं घेतल्यावर त्यांच्या कारकिर्दीबद्दल एक दरारा निर्माण होतो, परंतु अर्थातच मनुष्याच्या आयुर्मानामुळं त्याच्या कारकिर्दीवर मर्यादा येऊ शकतात, परंतु या अशा कंपन्यांच्या बाबतीत याला फाटा मिळू शकतो. या दिग्गज कंपन्यांभोवतीदेखील एक वलय, दरारा असतोच, ज्यालाच आपण बिझनेसच्या भाषेत मोनोपॉली म्हणू शकतो.
अशा कंपन्यांची नावं इथं नमूद करण्याआधी आपण काही गोष्टी पाहू आणि त्यातच या कंपन्यांची नावं दडलेली पाहता येतील.
* अगदी लहान मुलांना आपण कॅडबरी देतो. (‘कॅडबरी’ज ही कंपनी असून खरा शब्द चॉकलेट बार)
* प्रथमच्या चार-पाच महिन्यानंतर तान्हुल्यासाठी सर्रास लॅक्टोजेन / सेरेलॅक मागवलं जातं, खरा शब्द – बेबी फूड.
* अजूनही गावाकडं सकाळी दात घासण्यासाठी कोलगेटचीच भाषा कळते, खरा शब्द टूथ-पेस्ट.
* झटपट खाण्यात मुलं मॅगीलाच पसंती देतात, खरा शब्द, इन्स्टंट नूडल्स.
* शहराबाहेर गेल्यास आपण तब्येतीच्या काळजीपोटी हक्कानं बिसलरीचंच पाण्याचा अट्टाहास करतो, खरा शब्द, पॅकेज्ड अथवा मिनरल वॉटर.
* थंडीत ओठ फाटल्यावर आपण पटकन व्हॅसलिन लावतो. ‘व्हॅसलिन’ हे हिंदयुनिलिव्हरचं उत्पादन असून त्यासाठीचा खरा शब्द, पेट्रोलियम जेली.
* प्रथम घरी आलेल्या खास मित्र-मैत्रिणीला झटकन नेसकॉफीच ऑफर केली जाते, खरा शब्द, इन्स्टंट कॉफी.
* आज आपण अर्ध्या तासात निश्चितपणे ‘डॉमिनो’ज कडून डिलिव्हरी मिळणार हे गृहीत धरून निश्चिन्तपणे वाट पाहू शकतो, ‘डॉमिनो’ज हा ज्युबिलंट फूडवर्क्सचा ब्रँड असून – खरा शब्द आहे, तयार पिझ्झा.
* अॅडमिशनच्या काळात विशेषकरून कॉलेजच्या समोर मोठ्ठाल्ला झेरॉक्सचा बोर्ड दिसल्यास एक वेगळंच समाधान मिळतं, खरा शब्द फोटोकॉपी…
* 2000 साली अगदी धारावीत प्रत्येक झोपडीवर डिश टीव्ही असणं याचं अप्रूप होतं, खरा शब्द, डीटूएच.
* घरात सुतारकाम म्हटल्यावर फेवीकॉल लागणारच ना, खरा शब्द, वूड अधेसिव्ह.
* सर्व गोष्टी एकाच ठिकाणी डी-मार्टमध्ये हमखास मिळतील हो… – खरा शब्द, डिपार्टमेंटल स्टोअर.
या कंपन्यांनी आपल्या दर्जेदार उत्पादनांनी आपली खास ओळख/ब्रँड असा काही आपल्या मनावर ठसवलाय की आपण ठरवूनसुद्धा त्यापासून फारकत घेऊ शकत नाहीयेय. याही व्यतिरिक्त थम्प्स अप, पारले-जी, ब्रिटानिया, आयटीसी, मारुति, एक्साईड, बजाज, जिलेट, डाबर, आयआरसीटीसी, एशियन पेंट्स, मॅरिको, बॉश अशा अनेक कंपन्या आपणांस त्यांच्या बेहतरीन
दर्जेदार उत्पादनांमुळं परिचयाच्याच असतीलच.
अशा अनेक कंपन्या आहेत, परंतु आजमितीस वरीलपैकी ज्यांची बाजारात मक्तेदारी आहे त्यांची उदाहरणं पाहू…
आयआरसीटीसी – संपूर्ण भारतभर रेल्वे तिकीट विक्री केवळ याच कंपनीद्वारे होऊ शकते, तसेच भारतीय रेल्वेच्या कोणत्याही स्थानकावर बंद पाण्याची बाटली कंपनीच्या ’नीर’ उत्पादना व्यतिरिक्त विकण्यास परवानगी नाही. रेल्वेतील खानपान सेवा संपूर्णपणे यांच्या मालकीची आहे, अशी 100 टक्के मक्तेदारी या कंपनीची आहे.
एचएएल – 1940 मध्ये वालचंद हिराचंद आणि म्हैसूर सरकार यांनी भारतात विमानांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी सरकारी मालकीची आहे आणि विमान, जेट इंजिन, हेलिकॉप्टर आणि त्यांचे सुटे भाग डिझाईन, फॅब्रिकिंग आणि असेंबलिंगशी संबंधित आहे.
नेस्ले – शिशु आहार उत्पादनांमध्ये 96 टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा कंपनीकडं असून याव्यतिरिक्त नूडल्स, सूप, कन्फेक्शनरीज व बेव्हरेजेस माध्यमांतून कंपनीस उत्पन्न आहे.
कोल इंडिया – कोल इंडिया लिमिटेड ही कोळसा खाण आणि परिष्कृत अशी जगातील सर्वांत मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची असून कोळसा मंत्रालयाद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. भारतातील एकूण कोळशाच्या उत्पादनापैकी कंपनीचे योगदान 82 टक्के आहे.
हिंदुस्तान झिंक – हिंदुस्तान झिंक ही जगातील दुसर्या क्रमांकाची जस्त-शिसं खाणकाम करणारी कंपनी आहे आणि भारताच्या प्राथमिक जस्त उद्योगात त्याचा वाटा 78 टक्के आहे.
आयटीसी – गेल्या काही दशकांत कंपनीनं आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणली असली तरी भारतीय बाजारात अजूनही त्यांचा सिगरेट व्यवसाय एकूण व्यवसायाच्या 77 टक्के इतका आहे.
मॅरिको – मॅरिको ही भारतातील नामांकित एफएमसीजी कंपन्यांपैकी एक आहे, परंतु बहुतेक त्यांचं यश त्यांच्या ’सफोला’ आणि ‘पॅराशूट’ मधून आहे. प्रीमियम परिष्कृत खाद्यतेल विभागात सफोलाचा वाटा 73 टक्के असून दुसरीकडे ‘पॅराशूट’चा मार्केट शेअर 59 टक्के जे कंपनीस 90 टक्के उत्पन्न देतात.
पिडीलाईट – नुकतीच आपली स्पर्धक कंपनी, अॅरलडाईट ताब्यात घेऊनकंपनीचा अधेसिव्ह बाजारातील हिस्सा 70 टक्क्यांहून अधिक आहे.
कंटेनर कॉर्पोरेशन – मुख्य व्यवसाय मालवाहू वाहकाचा टर्मिनल ऑपरेटर, वेअरहाउस ऑपरेटर आणि एमएमएलपी ऑपरेशनचा समावेश आहे. 2019-20 मध्ये देशांतर्गत व्यवसायातील बाजारात हिस्सा 68 टक्के आहे.
यांखेरीज,
आयशर मोटर्स – मध्यम पल्ल्याच्या दुचाकी 95 टक्के हिस्सा,
सिप्ला – निकोटेक्समधील 95 टक्के हिस्सा,
कॅडीला – कृत्रिम स्वीटनर 94 टक्के,
ज्युबिलंट फूडवर्क्स – तयार पिझ्झा प्रकारातील 77 टक्के हिस्सा,
एचडीएफसी बँक – कॉर्पोरेट बँकिंगमध्ये 75 टक्के,
बायोकॉन – इन्शुलिन बाजारातील 75 टक्के,
गेल – गॅस ट्रान्समिशनमधील 70 टक्के हिस्सा,
जिलेट – दाढीसाठी लागणारी उत्पादनं 70 टक्के हिस्सा,
डाबर – पॅकेज्ड फलरस प्रकारातील 60 टक्के हिस्सा.
आज या कंपन्या आपण गेली अनेक दशकं पाहात आलोय, त्यांची उत्पादनं वापरत त्यांना आपणच मोठं केलेलं आहे आणि आज त्यांच्या नफ्यामध्ये एक भागधारक म्हणून आपला हिस्सा अजूनपर्यंत का नसावा?
* सुपरशेअर – हिंदुस्तान इलेक्ट्रो ग्रॅफाइट
जागतिक स्तरावरील स्टील उत्पादनातील वाढ आणि नजीकच्या काळात इलेक्ट्रोडची मागणी वाढेल, अशा अपेक्षेनं भिलवारा समूहातील इलेक्ट्रोड बनवणार्या हिंदुस्तान इलेक्ट्रो ग्रॅफाइट (कएॠ) कंपनीचा शेअर मागील आठवड्यात तब्बल 42 टक्के उसळला. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत स्टील उत्पादनातील एकूण पुनर्प्राप्तीमुळे ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स (जीई) मागणीत वाढ दिसू लागली. पुढं जाऊन स्टील उद्योगात उत्पादन वाढीचा कल आणि बांधकाम व ऑटोमोबाइल्ससारख्या मोठ्या स्टील वापरणार्या उद्योगांमध्ये पुनर्प्राप्तीसह सुरू राहण्याची शक्यता आहे. त्याजबरोबरीनं, भारतीय पायाभूत सुविधांवर सरकारी खर्च वाढवण्याच्या नुकत्याच जाहीर झालेल्या घोषणेनं देशांतर्गत पोलाद उद्योगही वाढण्यास सक्षमता दाखवत असून याचा फायदा हेग व ग्रॅफाइट इंडिया अशा कंपन्यांना मिळू शकतो. दोन वर्षांपूर्वी 4900 रुपयांवर असलेला या कंपनीचा भाव गेल्या वर्षी 500 रुपयांच्या खाली जाऊन आलेला आहे.
-प्रसाद ल. भावे ( 9822075888), sharpfinvest@gmail.com