Breaking News

राज्यात नवे निर्बंध लागू

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात गुरुवारी (दि. 22) रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू झाले आहेत. यामध्ये कार्यालयातील उपस्थिती, लोकल प्रवास, लग्न समारंभ ते अत्यावश्यक सेवेसंदर्भातील अनेक नियमांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील, असेही मंत्र्यांनी सांगितले होते, मात्र थेट लॉकडाऊन शब्द न वापरता कठोर निर्बंध लावण्यात आले असून, ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.
राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त 15 टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र 13 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना 15 टक्के किंवा पाच कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेनुसार 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.
लग्न समारंभ फक्त एकाच हॉलमध्ये दोन तासांत पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणार्‍या कुटुंबाला 50 हजार रुपये दंड, तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल.
बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायाने फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील. आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणार्‍यांवर 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर 14 दिवसांच्या क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बससेवा पुरवणार्‍यानेच मारणे बंधनकारक आहे. खासगी बसेसमधून येणार्‍या प्रवाशांची चाचणी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडून किंवा बससेवा पुरवणार्‍याकडून घेतला जाईल.
कोणताही खासगी बससेवा पुरवठादार या नियमांचा भंग करताना आढळला, तर त्याला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. वारंवार नियमांचा भंग केल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. ठराविक ठिकाणच्या कोरोना परिस्थितीनुसार तिथून येणार्‍या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारावा किंवा नाही याबाबत स्थानिक आपत्ती निवारण व्यवस्थापन निर्णय घेऊ शकेल. राज्य, केंद्र शासन आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांची गरज असणार्‍या व्यक्ती आणि त्यांच्यासोबत एक अतिरिक्त व्यक्ती यांनाच तिकीट व पास दिले जातील. फक्त यांनाच लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेलमधून प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हे नियम लागू नसतील. राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला 50 टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल.
जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा सेवा देणार्‍या बस किंवा रेल्वे प्रवासासाठी रेल्वे अधिकारी किंवा एसटी बस अधिकार्‍यांना स्थानिक प्रशासनाला प्रवाशांच्या स्क्रीनिंगविषयी सर्व माहिती पुरवावी लागेल. थांब्यावर उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणे दिसल्यास कोरोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठवले जाईल. प्रवाशांची कोरोना चाचणी करायची असल्यास स्थानिक प्रशासन एका अधिकृत लॅबला प्रवाशांच्या चाचणी करण्याचे काम देऊ शकते. या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडूनच घेतला जाईल, तसेच विशिष्ट ठिकाणाहून येणार्‍या प्रवाशांना हातावर शिक्का मारण्यापासून किंवा होम क्वारंटाइन करण्यापासून सूट देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.
लग्नाच्या वेळेवरून चर्चा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांपैकी लग्नासंदर्भातील नियम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सरकारकडून लग्न दोन तासांत उरकण्यास सांगण्यात आले आहे. यावरून अनेकांनी मुख्यमंत्रीसाहेब, लग्न दोन तासांत कसे उरकायचे तुम्हीच सांगा, अशी विचारणा केली आहे. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का? 25 जणांपर्यंत ठीक होते, पण दोन तासांत कसे शक्य आहे? भावनांचा खेळ मांडला का? असे सवाल अनेकांनी केले आहेत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply