आमदार महेश बालदी यांची मागणी
खालापूर ः रामप्रहर वृत्त
खालापूर तालुक्यातील हशाचीपट्टी आदिवासीवाडी येथे मतदान केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे केली आहे.
आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हशाचीपट्टी ही आदिवासीवाडी माथेरान डोंगराच्या पायथ्याखाली असून 280 मतदार या ठिकाणी आहेत, मात्र
येथील मतदारांना मतदानासाठी 50 किलोमीटर प्रवास करावा लागतो. त्यांना हशाचीपट्टी ते माथेरान-दस्तुरी-नेरळ-बोरगाव (आंबेवाडी) असे अंतर पार करून मतदान करण्याकरिता यावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ व पैसा जात असल्याने बरचसे मतदार मतदानाकरिता येत नाहीत. त्यामुळे या हशाचीपट्टीमध्येच मतदान केंद्र निर्माण करावे, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे केली आहे.