Breaking News

मराठी साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले -डॉ. रवींद्र शोभणे

राजस्तरीय स्पर्धेत ’दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ’सृजन’ अंक प्रथम

मुंबई ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित ’दीपावली’ आणि रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय जाधव संपादित ’सृजन’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांकाचा सन्मान पटकाविला. राज्यस्तरीय विजेत्या अंकाला एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, तर रायगड जिल्हास्तरीय विजेत्या अंकाला 40 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा यांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे, असे प्रतिपादन केले, तर येत्या दिवाळी अंक स्पर्धेपासून डिजिटल दिवाळी अंकांना पुरस्कार देण्याची घोषणा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून केली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास स्पर्धेचे आयोजक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, माध्यम सल्लागार जयु भाटकर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार निला उपाध्ये, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त व दै. ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, परीक्षक अविनाश कोल्हे यांच्यासह विविध दिवाळी अंकांचे संपादक, लेखक, साहित्यिक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले की, मराठी माणूस नाटक, दिवाळी अंक आणि साहित्य संमेलन हे तीन वेड जपतो आणि त्या अनुषंगाने दिवाळी अंक वाचन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. दिवाळी अंकांनी साहित्य परंपरा जपली, मात्र दिवाळी अंक जाहिरातींच्या मदतीशिवाय उभा राहू शकत नाही. दिवाळी अंक शब्द साहित्याची परंपरा असून साहित्य क्षेत्रातील बदल दिवाळी अंकांनी आत्मसात केले आहेत. दिवाळी अंक म्हणजेच शिस्तीचे लेखन असते. आपल्या लेखनात बदल करू नये असा अट्टाहास लेखकाचा असतो, पण ज्या वेळी गरज पडेल त्या ठिकाणी लेखकाच्या लेखनात आवश्यक सुधारणा करण्याचे काम संपादकांनी केले पाहिजे.
मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्याचे काम लेखकांनी केले आहे. राजकीय लोकांकडून साहित्याबद्दल प्रेम क्वचितच दिसते, परंतु याला माजी खासदार रामशेठ ठाकूर अपवाद आहेत. त्यांचे मराठी साहित्यवरील प्रेम नेहमीच अधोरेखित झाले आहे. साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम होत असताना या विश्वाला पुरस्कृत करण्याचे काम रामशेठ ठाकूर यांनी केले आहे आणि हे औदार्यपूर्ण काम असून या कामाचे मोल पाहून मी नागपूरहून या सोहळ्याला हजर झालो, असेही डॉ. शोभणे यांनी नमूद केले.

– डिजिटल दिवाळी अंकालाही पाठबळ देणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

परदेशात असलेल्या मराठी माणसाला दिवाळी अंक वाचनाची आवड आहे, मात्र तो भारतात येऊन अंक घेऊ शकत नाही. त्यामुळे डिजिटल आवृत्तीला त्याची पसंती असते आणि त्यामुळे आता डिजिटल अंकांची जास्तीत जास्त निर्मिती होऊन ही वाचनाची भूक भागवण्यासाठी डिजिटल दिवाळी अंकांनाही पुरस्कार देण्याची विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी या वेळी केली. यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी हिरवा कंदील देत येत्या दिवाळी अंक स्पर्धेपासून डिजिटल अंकांना पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता डिजिटल दिवाळी अंकालाही पाठबळ मिळणार आहे.
घरात शोकेस नसली तरी चालेल पण बुककेस हवी -सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा
या वेळी सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका नीरजा यांनी म्हटले की, कुठल्याही देशात भौतिक आर्थिक आलेखापेक्षा सांस्कृतिक आलेख महत्त्वाचा असतो. त्यामुळे संस्कृतीची व्याख्या लोप पावून चालणार नाही. संस्कृती म्हणजे फक्त धर्म, सण, उत्सव नाही तर कला, विज्ञान, वाचन, तत्वज्ञान हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संस्कृती समृद्ध करण्यासाठी बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे आहे. वाचन संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ती वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. दिवाळी अंकाची परंपरा मोठी असून पोटाची भूक, भावनिक आणि बौद्धिक भूक भागवण्याचे काम दिवाळी अंकातून होत आहे. वाचन संस्कृती आणि बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे यासाठी घरात शोकेस नसली तरी चालेल पण बुककेस असली पाहिजे. दिवाळी अंक भाषा आणि दिशा देतात आणि त्यासाठी ही सर्व माणसे झटत असून माजी खासदार रामशेठ ठाकूर हे मराठी शब्द साहित्यासाठी काम करीत आहेत, अशा शब्दांत नीरजा यांनी कौतुक केले.

– सर्वांच्या सहभागातून स्पर्धा मोठी झाली -आमदार प्रशांत ठाकूर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1996 सालपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील उपक्रमे अखंडपणे सुरू आहेत. यामध्ये दिवाळी अंक स्पर्धा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेपासून सुरू झालेली ही स्पर्धा राज्यस्तरीय झाली आणि या स्पर्धेला मुंबई मराठी पत्रकार संघाची गेली अनेक वर्षे साथ लाभली आहे. सर्वांच्या सहभागातून ही स्पर्धा मोठी झाली, असे सांगून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

– देशातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा -संदीप चव्हाण

दिवाळी अंक ही पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलेली आणि महाराष्ट्रातच नाही, तर देशातील सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा आहे आणि हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे शक्य झाले आहे, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकांच्या 113 वर्षांच्या परंपरेत खंड पडला नाही. त्या अनुषंगाने सन 2023 अर्थात 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अविनाश कोल्हे, मंजुषा कुलकर्णी व सुनील धोपावकर यांनी काम पाहिले.

सविस्तर निकाल व पारितोषिक
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा …..
प्रथम क्रमांक ः गिरगाव येथील अशोक कोठावळे यांचा ’दीपावली’ अंक (एक लाख रुपये, सन्मानचिन्ह), व्दितीय क्रमांक ः गोरेगावच्या अरुण शेवते यांचा ’ऋतुरंग’ अंक (50 हजार रुपये, सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक ः ठाणे येथील शुभदा चौकर यांचा ’वयम’ अंक (30 हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट विशेषांक ः पुण्याचे मोतीराम पौळ यांचा ’अक्षरदान’ (15 हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट दिवाळी अंक ः अभिराम अंतरकर यांचा ’हंस’, (15 हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट कथा ः युगांतर अंकातील लेखक पंकज करुळकर यांची इनसायडर (सात हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट कविता ः मौज अंकातील कवियित्री संगीता बर्वे यांची (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट मुखपृष्ठ ः चंद्रकांत दिवाळी अंकासाठी किरण हणमशेठ यांची चितारलेले (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट व्यंगचित्र धमाल धमाका अंकातील घनश्याम देशमुख यांचे (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट लेख ः चंद्रकांत अंकातील अनिल पाटील यांचा (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), लक्षवेधी परिसंवाद ः अक्षर अंकातील ’एआयचे जग’ (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), लक्षवेधी मुलाखत ः लय भारी अंकातील डॉ. राजुरकर यांची (पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह).

  • रायगड जिल्हास्तरीय पारितोषिके
    प्रथम क्रमांक ः विजय जाधव यांचा ’सृजन’ अंक (40 हजार रुपये, सन्मानचिन्ह), व्दितीय क्रमांक ः विनोद साळवी यांचा ’शब्द संवाद’ अंक (20 हजार रुपये, सन्मानचिन्ह), तृतीय क्रमांक ः शारदा धुळप यांचा ’साहित्य आभा’ अंक (10 हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्तेजनार्थ दोन बक्षिसे ः प्रमोद वालेकर यांचा ’दैनिक किल्ले रायगड’ आणि दीपक म्हात्रे यांचा ’आगरी दर्पण’ अंक (प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट कथा ः साहित्यविश्व अंकातील राजेंद्र सोनावणे यांची आसक्या (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट कविता ः इंद्रधनू, अंकातील विजय इंद्रकेशव यांची कोण असे तू (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह), उत्कृष्ट मुखपृष्ठ ः साहित्य आभा अंकासाठी विवेक मेहेत्रे यांनी चितारलेले (तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह).

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply