Breaking News

मनोजकुमार ः देशभक्तीचा हुकमी फॉर्मुला

साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीवर विशेष प्रभाव टाकलेला कलाकार म्हणजे मनोजकुमार. 24 जुलै रोजीच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
तुम्हालाच मी सुरुवातीस प्रश्न करतो, तुम्हाला मनोजकुमार अभिनेता म्हणून आवडतो की दिग्दर्शक म्हणून? पडद्यावरचा सोबर कलाकार की जनसामान्यांमध्ये देशभक्ती जागी करणारा सिनेमावाला? हाच मनोजकुमार काहींच्या दृष्टीने मात्र थट्टेचा विषय असतो, तर काहींना त्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आल्याचे आवडले नाही. होतं असे कधी कधी. एकाच यशस्वी माणसाबद्दल अनेकांची भिन्न मते असू शकतात.
मला दिग्दर्शक म्हणून मनोजकुमार जास्त आवडतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि त्यात त्याने मास्टरी दाखवली. एकदा आशा पारेखच्या मुलाखतीचा योग आला असता मनोजकुमारबद्दल मी प्रश्न करताच आशा पारेखने मला सांगितले, त्याच्यासोबत काम करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, एक तर आपले दृश्य कॅमेर्‍यातून कसे दिसतेय हे जाणून घेण्यासाठी मनोजकुमार कॅमेरामनच्या मागे उभे राहून जाणून घेई तसेच तो आपलं दृश्य नसले तरी असेच करे. सुरुवातीस मला समजेना तो असे का करतोय. मग लक्षात आले तो दिग्दर्शक व्हायची तयारी करतोय आणि त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘उपकार’ची मी नायिका होते, आशा पारेखने म्हटलं. आणि त्या मताशी मी सहमत आहे.
मी मनोजकुमारवर फोकस टाकतो तेव्हा, साठ सत्तरच्या दशकातच ’देशभक्तीपर चित्रपटाचा हुकमी जनक’ अशी स्वतःची ओळख निर्माण केली (आजच्या कार्पोरेट युगात त्याला फॅशन म्हणून ’ब्रॅण्ड नेम’ म्हणतात…). त्यातून त्याचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला (चित्रपटाच्या जगात ही मिळकत खूपच मोठी असते. प्रेक्षकांना आपलसं करणे, त्यांना आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटाबद्दल विश्वास वाटणे हे अजिबात सोपे नाही…. ती एक वेगळीच खेळी) आणि मनोजकुमार निर्मित व दिग्दर्शित चित्रपट पडद्यावर आला रे आला की देशभक्तीभावाने पाहणे हे जणू हुकमी समीकरण. ग्रेट. मानलं त्याला.
केवल कश्यप निर्मित व एस. राम शर्मा दिग्दर्शित ’शहीद’ (1965) चित्रपटात मनोजकुमारने शहीद भगतसिंग साकारला आणि जणू ’देशभक्त नायक ’ अशा त्याच्या प्रतिमेची जणू पायाभरणी झाली. या चित्रपटाच्या यशाने त्याला हे दिले… यशस्वी चित्रपट प्रत्येकाला काहींना काही देत असतोच. आपला हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पहावा म्हणून मनोजकुमारने केलेली विनंती त्यांनी मान्य केली आणि फक्त अर्धा तास आपण हा चित्रपट पाहू असे म्हटले, पण चित्रपटाने माननीय पंतप्रधानाना विलक्षण प्रभावित केले. त्यांनी ’शहीद’ चित्रपट पूर्ण पाहिला आणि मनोजकुमारला विनंती केली, आपल्या देशाचे बोधवाक्य ’जय जवान जय किसान’ याला प्राधान्य मिळेल असा चित्रपट त्याने निर्माण करावा. नवी दिल्ली ते मुंबई अशा राजधानी एक्स्प्रेस प्रवासात त्याने यावर मनोमन विचार केला. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. मनोजकुमारने यापासून प्रेरणा घेऊन एक चित्रपट लिहायला घेतला, आपण निर्माता व दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकायचे ठरवले, विशाल एन्टरप्रायझेस ही आपली चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि साठच्या दशकातील भारतीय समाजमनाचे प्रतिबिंब पडेल असा चित्रपट पडद्यावर आणला, ’उपकार’ ( 1967). आजही या चित्रपटाच्या नावाभोवतीचे वलय कायम आहे, हे खरे यश.
यात मनोजकुमारने ’भारत’ नावाची व्यक्तीरेखा साकारली. तीच त्याची मग ’देशभक्त नायक भारतकुमार’ अशी ओळख झाली. ती त्याला कायमच चिकटली. त्याच्या निस्सीम चाहत्यांना हीच इमेज प्रचंड प्रिय. मनोजकुमारने पहिल्याच दिग्दर्शनात काही लक्षवेधक गोष्टी केल्या. क्रूरकर्मा व्हीलन म्हणून ज्याला पडद्यावर आला की ज्याचं छद्मी कावेबाज हास्य, कपटी नजर आणि दुष्ट हेतूने भुवया उंचावणारच अशा’….. आणि प्राण याला ’उपकार’मध्ये चक्क पडद्यावरचा सभ्य माणूस बनवले. (प्रत्यक्षात तो प्रचंड समजदार होता, हे एका मुलाखतीच्या निमित्ताने मी अनुवभलंय) आणि चित्रपटातील मेरे देश की धरती सोना उगले… हे देशभक्तीवरील सळसळते गाणे असं आणि इतकं काही लोकप्रिय झाले की तेव्हापासून आजपर्यंत आणि आता पुढेदेखील प्रत्येक राजकीय सणाला लाऊडस्पीकरपासून अनेक माध्यमातून आवर्जून त्याला स्थान मिळतेच मिळते. लोकप्रिय गाणी एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्यांत नेत असतातच ते हे असे. रेडिओ विविध भारतीपासून इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्सपर्यंत सगळीकडे मेरे देश की धरती….
’उपकार’ मुंबईत मेन थिएटर लिबर्टीत प्रदर्शित होताच फर्स्ट शोपासूनच सुपर हिट. काही आठवड्यांनी ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात आला आणि ज्युबिली आठवडे मुक्काम केला. रौप्य महोत्सवी यश म्हणजे पिक्चर हिटवर कायमचे शिक्कामोर्तब.
’उपकार’ने सर्वात महत्त्वाचे काय केले? मनोजकुमारमधील निर्माता व दिग्दर्शकाचा आत्मविश्वास वाढवला. त्यासह आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटातील प्रत्येक गाण्याचे अप्रतिम आणि विलक्षण प्रभावी असे दृश्य सौंदर्य दाखवण्यातील त्याची कल्पकता क्या कहने? एक स्वतंत्र गोष्ट. पडद्यावर गाणे कसे असावे याचे उत्तम उदाहरण. पटकथेच्या ओघात ती गाणी येत असल्यानेच पडद्यावर गाणे सुरू होताच कोणी खुर्ची सोडून लघुशंका अथवा चहाला बाहेर पडत नसे, हेसुद्धा महत्त्वाचं. भारतीय चित्रपट संस्कृतीत गीत संगीत व नृत्य हा गाभा. आणि त्यात ठसा उमटवून वेगळेपण अधोरेखित करणे हे मनोजकुमारचे विशेष यश.
दिग्दर्शक असा अनेक गोष्टींसह घडतो असेच म्हणायला हवे. ’उपकार’च्या यशानंतर मनोजकुमारने आपल्या पुढच्या चित्रपटाची कथा कल्पना ठरवली, विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये राहत असलेल्या भारतीयांना आपल्या भारत देशाच्या संस्कृती, परंपरा, सभ्यता, मूल्ये यांचे महत्त्व एका प्रेमकथेतून पटवून देणे. भारतीय नायक (मनोजकुमार) लंडनला जातो आणि तेथे स्थायिक झालेल्या भारतीय नायिकेसोबतची (सायरा बानू) त्याची प्रेमकथा असे मध्यवर्ती कथासूत्र. चित्रपटाचे नाव ’हरे राम हरे कृष्ण’. (नाव वाचून दचकलात का?)
मनोजकुमार सायरा बानूला साईन करण्यासाठी पाली हिलवरील तिच्या बंगल्यावर गेला असता दिलीपकुमारने नेहमीप्रमाणेच अतिशय दिलखुलासपणे त्याचे स्वागत केले. त्याला वाटले मनोजकुमार आपल्याला साईन करायला आला आहे. (या दोघांनी तत्पूर्वी आदमी या चित्रपटात एकत्र भूमिका साकारलीय, मनोजकुमार दिलीपकुमारचा जबरदस्त फॅन. त्याच्या अभिनय शैलीवर दिलीपकुमारचा विलक्षण प्रभाव. त्याला तात्कालिक समीक्षक ’नक्कल’ म्हणत). आपल्याला नव्हे तर सायरा बानूला साईन करण्यासाठी मनोजकुमार आला आहे हे समजताच दिलीपकुमार आतल्या रूममध्ये गेला…
चित्रपटातील अन्य कलाकारांची निवड, तंत्रज्ञांची आखणी, गाण्यांचे रेकॉर्डिंग, देश-विदेशातील शूटिंगच्या तारखा हे सगळेच घडत असतानाच चित्रपटाचे नाव ’पूरब और पश्चिम’ असे करण्यात आले. (देव आनंदने मनोजकुमारकडून ’हरे राम हरे कृष्ण’ हे नाव घेऊन त्या नावाचा चित्रपट बनवला आणि तोही सुपरहिट. हाही एक फिल्मी अड्ड्यावरचा मस्त किस्सा)
आता थीमनुसार लंडनला शूटिंग, पण मनोजकुमारला विमान प्रवासाची अ‍ॅलर्जी (की भीती?) म्हणून त्याने आपले काही सहकलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासह चक्क मुंबई ते लंडन बोटीने येण्या-जाण्याचा प्रवास केला. महिना लागला म्हणे. या अनुभवावर त्याने एक चित्रपट निर्माण करायला हवा होता.
चित्रपटात अशोककुमार, विनोद खन्ना, भारती, निरूपा रॉय, प्रेम चोप्रा, मदन पुरी, मनमोहन, ओम प्रकाश इत्यादींच्या प्रमुख भूमिका. विनोद खन्नाची भूमिका छोटी होती, पण मनोजकुमारने त्याला सल्ला दिला, तू माझा चित्रपट साईन केल्याची मीडियात काही ठिकाणी बातमी प्रसिद्ध करून आण. चित्रपटसृष्टीचे तुझ्याकडे लक्ष जाईल. विनोद खन्नाने ते करताच त्याला एकदम आठ चित्रपट मिळाले. चित्रपटसृष्टीच्या कार्यशैलीचे हे एक उत्तम उदाहरण. अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींसह चित्रपटाचे जग गुंफलंय, रंगलंय, उत्सुकता वाढवतेय.
चित्रपटाची गाणी इंदिवर, प्रेम धवन आणि संतोष आनंद यांची. त्यातही संतोष आनंद यांना चित्रपटाच्या श्रेयनामावलीत चक्क नवीन गीतकार असे श्रेय. (गीतकार, संगीतकाराबद्दल असं क्वचितच घडणारे) मनोजकुमारने नवी दिल्लीत एका कविसंमेलनात संतोष आनंद यांच्या कविता ऐकल्यावर तो विलक्षण प्रभावित झाला आणि त्यांना चित्रपट गीतकार म्हणून पहिली संधी दिली. संतोष आनंद यांनी ’पूरवा सुहानी आयी रे’ हे गाणे लिहिले आणि चित्रपटसृष्टीतील आपली वाटचाल सुरू केली. चित्रपटातील दुल्हन चली, कोई जब तुम्हारा, ओम जगदीश हरे, ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार, भारत का रहनेवाला हू ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटात खरंतर पाहण्यासारखे हेच होते. संगीत कल्याणजी आनंदजी यांचे. त्या काळात रेडिओवर गाणी ऐकवण्यासाठी संगीतकारांना पुढाकार घ्यावा लागे. तसा त्यांनी तो न घेतल्याने मनोजकुमारने त्यानंतर त्यांच्यासोबत काम करणेच थांबवले.
चित्रपटाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासून होते तो भाग कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट आहे आणि मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चित्रपट रंगीत आहे. चित्रपट रसिकांना हे फार आवडले.
मनोजकुमारच्या दिग्दर्शनातील ’शोर’ (1972), रोटी कपडा और मकान (1974), क्रांती (1981) या चित्रपटात यशाची चढती कमान अनुभवली. त्यानंतर मात्र ’घसरण’ सुरू झाली. जणू फॉर्म हरवला. एव्हाचा चित्रपट रसिकांची पुढची पिढी आली होती. मनोजकुमार दिग्दर्शित ’क्लर्क’ (1989) आणि ’जय हिंद’ (1999) अपयशी ठरले आणि मनोजकुमारने दिग्दर्शक म्हणून थांबणे पसंत केले. योग्य निर्णय. स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेल्या भल्याभल्याना कुठे कधी नि का थांबायचे हेच समजत नाही आणि पुढील पिढीच्या कार्यशैलीशी जुळवून घेता न आल्यास विलक्षण चिडचिड होत जाते… मनोजकुमारला वेळीच समजले आपण पडद्याआड जाऊन आपलं एक आयुष्य जगावे. आणि जुहू येथील आपल्या बंगल्याच्या जागी त्याने छान देखणी इमारत उभारलीय.
राजेश खन्नासोबत काम करण्याचे त्याचे दोन योग हुकले. ‘उपकार’मध्ये प्रेम चोप्राने साकारलेल्या भूमिकेसाठी राजेश खन्नाला विचारले होते अशी फोटो बातमी आजच्या सोशल मीडियात व्हायरल झाली. खरंतर या गोष्टीची कुठेच फारशी वाच्यता झाली नव्हती. तर ‘क्रांती’ निर्मितीच्या अगोदर मनोजकुमारने ‘नया भारत’ या चित्रपटाची घोषणा करताना त्यात राजेश खन्नाची भूमिका असल्याची बातमी त्या काळात इंग्लिश मीडियात प्रसिद्ध झाली होती. हेही घडायचे राहून गेले. आपले हुकमी दिग्दर्शक सोहनलाल कंवर यांनी ‘धनवान’मध्ये राजेश खन्नाला घ्यावे हा सल्ला मनोजकुमारचा!
मनोजकुमारच्या अन्य दिग्दर्शकांकडील चित्रपटातील काही महत्त्वाचे, त्यातून अभिनेता मनोजकुमार घडत गेला. विजय भट्ट दिग्दर्शित हरियाली और रास्ता व हिमालय की गोद मे, राजेंद्र भाटीया दिग्दर्शित डॉ. विद्या, किशोर शाहू दिग्दर्शित गृहस्थी व घर बसाके देखो, एस. राम शर्मा दिग्दर्शित शहीद, राज खोसला दिग्दर्शित वह कौन थी, दो बदन व अनिता, शक्ती सामंता दिग्दर्शित सावन की घटा, राजा नवाथे दिग्दर्शित गुमनाम व पत्थर के सनम, राम महेश्वरी दिग्दर्शित नील कमल, मोहन सैगल दिग्दर्शित साजन, राज कपूर दिग्दर्शित मेरा नाम जोकर, सोहनलाल कंवर दिग्दर्शित पहेचान, बेईमान व संन्यासी, एस. अली रझा दिग्दर्शित दस नंबरी, अशोक भूषण दिग्दर्शित शिरडी के साईबाबा या यशस्वी चित्रपटातून मनोजकुमारचे स्थान बळकट होत राहिले. विविध प्रकारच्या भूमिका त्याने यात वठवल्यात. भले कोणी म्हणोत तो दिलीपकुमारची नक्कल करे…
दुसरीकडे पहावे तर त्याच्या दिग्दर्शन प्रवासातील देशभक्तीचा सुपर हिट फॉर्मुला आणि गाण्यांचे अप्रतिम रुपेरी पडद्यावरील सादरीकरण या गोष्टी प्रचंड जमेच्या. मला त्याची तीच गोष्ट आवडते. मनोजकुमारला पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply