Breaking News

डिजिटल व्यवहार आत्मविश्वासाने करण्यासाठी…

डिजिटल व्यवहार करण्याची अपरिहार्यता आणि ते करताना होणार्‍या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक जण संभ्रमात सापडतात. अशांनी असे व्यवहार करताना घाबरून जाण्यापेक्षा त्याचे शिक्षण घेणे आणि काही दक्षता घेऊन असे व्यवहार करणे हाच मार्ग निवडला पाहिजे. या मार्गाने त्याचा स्वीकार करणे हेच या संभ्रमावरील उत्तर आहे.

गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. भारतीय नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा स्वीकार वेगाने केला असून त्याचे फायदे कोरोना संकटात आपण घेत आहोत, मात्र डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ ही सायबर गुन्हेगारांना आयतीच चालून आलेली संधी ठरली आहे. सायबर गुन्हे वाढल्याच्या बातम्या वाचल्यावर आपण अशा डिजिटल व्यवहारांच्या वाट्याला जाणार नाही अशी खूणगाठ काही जण बांधतात, मात्र डिजिटल व्यवहार इतके सर्वव्यापी होत आहेत की त्यापासून पळून जाणे आपल्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मी डिजिटल व्यवहार करणार नाही, असे म्हणण्याऐवजी मी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन त्याचे सर्व फायदे घेईन, असा संकल्प केला पाहिजे.

डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधीच्या जाहिराती रिझर्व्ह बँक नियमितपणे करताना दिसते. नागरिकांनी त्या जाहिराती पाहाव्यात आणि त्यातून बोध घ्यावा यासाठी अमिताभ बच्चनसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांची मदत घेतली जाते. या जाहिरातींचा निश्चित चांगला परिणाम होत आहे. अर्थात गेले काही दिवस सायबर गुन्हेगार नवनवीन क्लुप्त्या शोधून काढून फसवणूक करीत असल्याने अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊयात.

1. जे आपल्या घरातील डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून मोबाइल बँकिंग करतात, अशांनी अ‍ॅण्टीवायरस सॉफ्टवेअर घेतले पाहिजे. ते जर आपल्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये असेल तर त्यात तुम्ही त्या ठिकाणी वापरत असलेले पासवर्ड सुरक्षित राहतात. सेफ बँकिंग अशी सोय त्यात असते. हा खर्च आता अत्यावश्यक या सदरात टाकण्याची वेळ आली आहे. मोबाइलसाठीही असे अ‍ॅण्टीवायरस सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.

2. जे फोनवर आर्थिक व्यवहार करतात, त्यांच्या फोनमधील सिमकार्ड हा फोनचा आत्मा आहे. त्यामुळे सिमची सेवा अचानक बंद झाली, तर व्यवहारासंबंधी काळजी घेतली पाहिजे. आता तर एटीएममधून पैसे काढण्यासाठी फोनवर येणारा ओटीपी अनेक ठिकाणी अनिवार्य केला आहे. त्यातून व्यवहार अधिक सुरक्षित झाले असले तरी फोन दीर्घकाळ कोणाकडे ठेवणे किंवा त्याकडे लक्ष न देणे हे आता परवडणारे नाही. सिमकार्ड ज्या ठिकाणी बदलण्याची वेळ येते, अशा ठिकाणी ही प्रक्रिया शक्यतो आपल्यासमोरच झाली पाहिजे.

3. सर्व अ‍ॅप डाऊनलोड करून वापरलेच पाहिजे या मोहापासून आपण स्वत:ला रोखले पाहिजे. अगदी कामाचे असतील तर त्यांना फोनमधील माहिती देताना काळजी घेतली पाहिजे. असे अ‍ॅप गुगलच्या प्ले स्टोरमधूनच डाऊनलोड केले जातील हेही पाहिले पाहिजे.

4. फोनला सुरू करताना स्वत:चा अंगठा लावूनच फोन सुरू होतो अशी सोय आधुनिक फोनमध्ये आलेली आहे, तसेच विशिष्ट पद्धतीचा पॅटर्न अशी सोय तर सर्वच स्मार्ट फोनला उपलब्ध आहे. या दोन्ही सेवांचा फायदा घेतला तर फोन हरवल्यास किंवा दीर्घकाळ लांब राहिल्यास तो कोणाला वापरता येत नाही. त्यामुळे त्यावर कोणी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

5. आपल्याकडे असलेले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा धनादेश यांचा अमर्याद वापर रोखला जाईल अशी सोय आता रिझर्व्ह बँकेने केली आहे. अशा सर्व सोयी वापरताना त्यावर किती रकमेचे व्यवहार होऊ शकतात याची नोंद बँकेकडे करता येते. उदा. एखाद्या कार्डवर किंवा धनादेशावर एका वेळी जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचेच व्यवहार होऊ शकतात. जे बँकेत अधिक पैसे ठेवतात, त्यांनी या सुविधेचा लाभ घेतला पाहिजे.

6. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती अनेक साइट्सवर भरावी लागते. तेथे ती पुढील व्यवहारासाठीही सेव्ह करा, असे सांगितले जाते. अशी सोय शक्यतो घेऊ नये. तो व्यवहार झाला की सर्व माहिती काढून टाकावी.

7. मोबाइल खेळ खेळण्याचे प्रमाण वाढत असून खेळासंबंधातील अ‍ॅप अजूनही तेवढे सुरक्षित मानले जात नाहीत. मुले आपल्या मोबाइलवर जेव्हा खेळत असतात, तेव्हा ते सर्व माहिती देत असतात. त्यातून फसवणूक करणारे अ‍ॅप आर्थिक व्यवहारांची माहिती कॉपी करण्याची शक्यता असते.

8. प्रमोशन करणारे एसएमएस किंवा लिंकपासून सावध राहिले पाहिजे. एखादी सवलत मिळाली नाही तरी चालेल, पण आपण सायबर गुन्हेगारांचे सावज होता कामा नये. विशेषतः फोनवर केल्या जाणार्‍या मार्केटिंगपासून सावध राहिले पाहिजे.

9. साइट जेव्हा ओपन होते, तेव्हा ती जर सुरक्षित असेल तर युआरएलच्या सुरुवातीला एका कुलुपाचे चित्र येते. त्यामुळे साइट ओपन करताना ते कुलूप असेल तरच पुढे गेले पाहिजे.

10. क्यूआर कोडमुळे डिजिटल व्यवहार सोपे झाले आहेत, तसेच त्यातून फसवणूक करण्याचे मार्गही शोधले जात आहेत. जेव्हा आपण क्यूआर कोडचा वापर करून पेमेंट करतो, तेव्हा त्या दुकानदाराचे नाव खाली येते. ते पाहूनच पुढे गेले तर अशा व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता राहत नाही.

फसवणूक करण्याचे असे अनेक मार्ग शोधले जात असले तरी ते रोखण्याचे प्रयत्नही सुरू आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अशा नव्या उपाययोजनांची माहिती आपण घेत राहिले पाहिजे. डिजिटल व्यवहारात होणारी फसवणूक ही रस्त्यावर होणार्‍या अपघातासारखी आहे. अपघात होणार नाही म्हणून आपण काळजी घेतो, पण कधीतरी आपल्यालाही अपघात होऊ शकतो म्हणून आपण रस्त्यावर जाणे सोडत नाही. डिजिटल व्यवहारांची अपरिहार्यता आणि सोय ही अशीच गोष्ट आहे. आधुनिक काळात तिचा वापर वाढतच जाणार असून अनेक संधी त्यामुळेच आपल्यापर्यंत पोहचू शकणार आहेत. त्यामुळे सर्व ती काळजी घेणे ही नवी गरज मान्य करून डिजिटल व्यवहार आत्मविश्वासाने केले पाहिजेत.

(फोनवर माहिती घेऊन किती प्रकारे फसवणूक केली जाऊ शकते याविषयी ‘जामतारा, सबका नंबर आयेगा’ अशी एक मालिका नेटफ्लिक्सवर आहे. ती पाहून फोनवरील मार्केटिंगमधून कशी फसवणूक होऊ शकते याचा बोध होऊ शकतो.)

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply