Breaking News

उरणमध्ये बिबट्याची दहशत; लोक भयभीत

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिर्ले गाव परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणार्‍या जंगलात गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. एका व्यक्तीने बिबट्याला पाहिले होते, मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचार्‍यांसह पोलीस यंत्रणेनेही विश्वास ठेवला नव्हता, पण दोन दिवसांपूर्वी या बिबट्याने चिर्ले गावातील व्यक्तीला दर्शन दिल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी रात्री तीनच्या सुमारास चिर्ले गावातील संजय पाटील यांच्या घरासमोर एक बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. त्याने तिथे बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. तेव्हा पाटील यांना जाग आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडत होता. घरासमोरील झाडाखाली बांधलेल्या घोड्याने बिबट्याच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला दोरीने बांधले असल्याने तो धडपडून खाली पडल्याने जखमी झाला. त्या वेळी नागरिकांच्या आवाजाने बिबट्या कुत्र्याची शिकार घेऊन जंगलात पळून गेला.

याबाबत संजय पाटील यांनी प्राणीमित्र व वन्यजीव संरक्षक आनंद मढवी यांना कल्पना दिली. मढवी हे त्यांचे सहकारी पंकज घरत, सुमित मढवी यांच्यासह घटनास्थळी गेले आणि परिस्थितीची पाहणी करून त्यांनी तालुका वनाधिकारी शशांक कदम यांच्याशी संपर्क केला. सकाळी वनाधिकारी कदम, वनक्षेत्रपाल डी. डी. पाटील यांनी चिर्ले येथे येऊन पंचनामा केला. बिबट्याच्या भीतीने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरी वस्तीत बिबट्या येणे ही गंभीर बाब असून, बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करून संरक्षित जंगलात नेण्यात येईल. जनतेने घाबरून जाऊ नये.

-शशांक कदम, वनाधिकारी, उरण

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply