गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने आणखी एक झेप घेतली. कोरोनाच्या संकटात शेअर बाजारात हे काय चालले आहे अशी शंका अनेकांना येत असली तरी नजीकच्या भविष्यातील आशेवर विराजमान होणार्या शेअर बाजाराला हे नवे नाही. अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या शेअर बाजारातील तेजीचे कारण ठरत आहेत.
गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2020-21 या आर्थिक वर्षात भारताने आतापर्यंतची सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक 81.72 बिलियन्स अमेरिकी डॉलर्स जाहीर केलेली आहे. एकूण राज्यांपैकी गुजरातमध्ये एकूण 37 टक्के गुंतवणूक आली आहे, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे 27 आणि 13 टक्के गुंतवणूक आलेली दिसत आहे. दरम्यान, गुजरातमध्ये झालेल्या जवळपास गुंतवणुकीपैकी 94 टक्के संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षेत्रात झाली असल्याचे राज्याच्या निवेदनात म्हटले आहे. या क्षेत्रात देशाच्या एकूण परकीय गुंतवणुकीचा 78 टक्के वाटा आहे. 1.53 लाख कोटी रुपये एफडीआयद्वारे महाराष्ट्रात आले असून, कर्नाटक राज्याचा 78160 कोटी रुपये मिळवत देशात तिसरा नंबर लागला आहे. सर्वाधिक गुंतवणूक ही सिंगापूर, अमेरिका व मॉरिशसमधून झालेली आहे.
त्याचबरोबर अजून एक बातमी मागील आठवड्यात आपण पाहिली की, भारतीय रिझर्व्ह बँकेने 99 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडे देण्याचा ठराव केला आणि भारत पेट्रोलियम या सरकारी कंपनीनेदेखील आपल्या तिमाही निकालानंतर व कंपनीच्या खासगीकरणाच्या आधी तब्बल 12581 कोटी रुपये लाभांश जाहीर केला, जो आपसूकच केंद्र सरकारजमा होईल. याचा अर्थ काय? सरकारकडे पैशांचा ओघ आहे, ज्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम थोपविण्यासाठी सरकार पावले उचलू शकत आहे आणि कुणकूण आहे की सर्वांत पीडित म्हणजे पर्यटन क्षेत्रासाठी (रेल्वे, विमान वाहतूक, हॉटेल्स व चैनीच्या गोष्टी) सरकार मदत जाहीर करू शकते. लाभार्थी कंपन्या (आयआरसीटीसी, इंडिगो, बार्बेक्यू नेशन, हॉटेल कंपन्यांचे शेअर्स, पीव्हीहीआर, आयनॉक्स, डेल्टा कॉर्प, इ.).
एफसीजी किंवा ग्राहकाभिमुख उपभोग क्षेत्रात क्षेत्रनिहाय मदत जाहीर करताना त्याचा उपयोग थेट ग्राहकवर्गास होण्याची गरज आहे, जेणेकरून या लॉकडाऊनसदृश परिस्थितीत त्यांची क्रयशक्ती वाढून एकूणच ग्राहकाभिमुख उत्पादनांच्या विक्रीस उठाव येऊन त्याचबरोबर या कंपन्यांचे विक्रीचे आकडे पुढील तिमाहीमध्ये वाढताना दिसून येतील आणि हेच आजचे गुंतवणूक करण्याचे घोडे ठरू शकतील, परंतु असे न झाल्यास त्याचे परिणाम काय असू शकतील हे आताच वर्तविणे अवघड वाटत आहे. ग्राहकदेखील कंपन्यांकडून काही मोफत ऑफर्स, काही डिस्काऊंट्स यांसारख्या गोष्टींची अपेक्षा ठेवून आहेत. आश्चर्य म्हणजे नोंदणीकृत कंपन्या अशा गोष्टी न करता आपल्या खर्चात कपात करताना आणि आपले नफ्याचे मार्जिन्स वाढवताना तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या निकालांवरून दिसून येत आहे. याउलट टाटा ग्रुपने बिग बास्केटचे केलेले अधिग्रहण रिटेल क्षेत्रामध्ये रिलायन्स रिटेलला अजून चढाओढ निर्माण करणार हे नक्की, मात्र याचा फायदा ग्राहकास झाल्यास कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढू शकतात यात दुमत नको. (लाभार्थी – रिलायन्स व टाटा कंझुमर प्रॉडक्ट्स). तसेच लवकरच येऊ घातलेला झोमॅटो या डिलिव्हरी सेवा देणारा आयपीओ बर्याच गुंतवणूकदारांना हात देऊन जाईल असेदेखील वाटते.
मार्गो साबण व प्रिल डिशवॉशर बनवणारी कंपनी ज्योती लॅब्सचे कामत म्हणतात की, पाम तेल व पॅकेजिंगसाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याने त्यांच्या कंपनीचे कॉस्टिंग हे 6 टक्क्यांनी वाढले असून खाद्यतेल, चहा व कॉफी यांच्या किमती वाढत असल्याने अडाणी इंटरप्रायजेस, टाटा कॉफी, सीसीएल प्रॉडक्ट्स, बाँबे बर्मा यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सनी तेजी पकडलेली दिसते.
सर्वांची परिचित व सर्वांत जुनी टूथपेस्ट बनवणार्या कोलपाल (कोलगेट) कंपनीने मागील तिमाही व मार्च 2021 अखेरीस संपलेल्या तिमाहीमधील उत्पन्नामध्ये जेमतेम 52 कोटींची वाढ दर्शवत नक्त मार्जिन्समध्ये मात्र 40 टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवली आहे, ज्यामध्ये कंपनीने आपला जाहिरात, मनुष्यबळ व इतर खर्चास कात्री लावलेली आहे. त्यामुळे अशा कंपन्यांचे नफे उजवे दाखवले जाऊन अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी प्राप्त होऊ शकते. तसाच प्रकार या क्षेत्रातील आयटीसीसारख्या काही अग्रगण्य कंपनीच्या बाबतीत होऊ शकतो.
भारत आपल्या वार्षिक गरजेच्या सुमारे 65 टक्के म्हणजेच 14.5 दशलक्ष टन खाद्यतेल हे आयात करतो. वाढता वस्तूखर्च आणि इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेंटिना, युक्रेन व रशिया या प्रमुख उत्पादकांचे उत्पादन कमी झाल्याने व खराब हवामानामुळे आंतरराष्ट्रीय किमती वाढत आहेत, ज्याचा परिणाम एकूण भाववाढीत दिसत आहे. जगातील दुसर्या क्रमांकाचे उत्पादन देणार्या मलेशियामध्येदेखील कामगार तुटवड्यामुळे पामतेलाचा पुरवठा कमी झाला आहे. आता हा वस्तूखर्च कंपन्या स्वतःवर न घेता ग्राहकांच्या अंगावर टाकत असल्याने त्यांच्या तिमाही निकालामध्ये कोणताच बदल किंवा तोटा दिसत नाही. अशा परिस्थितीत अडाणी इंटरप्रायजेस (अडाणी विल्मार), मॅरिको (सफोला) यांसारख्या कंपन्या लाभार्थी ठरताना दिसू शकतील. अर्थातच या कंपन्या आपली तिमाही खाती कशी दर्शवतात यावर सर्व अवलंबून आहे, नाही का?
सुपर शेअर : बीएसई
मागील वर्षांमध्ये नवीन उघडलेल्या डीमॅट खात्यांची संख्या ही काही दशलक्ष आकड्यात होती आणि त्यामधील बरीचशी खाती ही सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) या कंपनीद्वारे उघडली गेली. जरी खाते उघडताना कोणतेही शुल्क आकारले जात नसले तरी ब्रोकरकडून खरेदी केलेले शेअर्स या खात्यात जमा होतात आणि त्यांची विक्री करताना प्रत्येक वेळेस सीडीएसएल कंपनी ही त्यावर त्यांचे किरकोळ म्हणजे 13 रुपये शुल्क लावते. हा झाला त्या कंपनीचा फायदा आणि म्हणूनच मागील वर्षभरात कंपनीचा शेअरभाव बराच वाढलेला दिसत आहे, परंतु आजही बीएसई म्हणजेच आधीचे नाव द बाँबे स्टॉक एक्स्चेंज या कंपनीचा 29 टक्के अधिहिस्सा सीडीएसएल या कंपनीमध्ये आहे. हीच गोष्ट बीएसईचा शेअर गेल्या आठवड्यात 24 टक्के वाढून सुपर शेअर ठरण्यामागे झालेली असू शकते. लवकरच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज कंपनीची प्राथमिक समभाग विक्री चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे मूल्यमापन जोखण्यासाठीदेखील या शेअरमध्ये तेजी येऊ शकते. दीर्घ मुदतीसाठी 1020 व 1150 ही उद्दिष्ट ठेवता येऊ शकतात.
-प्रसाद ल. भावे (9822075888), sharpfinvest@gmail.com