Breaking News

मृत्यूच्या दरडी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सडकमार्गे तळीये गावाकडे धाव घेतली, तेव्हा स्थानिकांनीच मदतकार्य जोरात सुरू करून अठरा ते वीस मृतदेह बाहेर काढले होते. आम्ही येथे पोहोचू शकलो तर सरकारी अधिकारी आणि मदतपथके का पोहोचू शकली नाहीत, असा तिखट सवाल गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्याला सरकारपाशी काय उत्तर आहे?

गेले चार दिवस कोसळणार्‍या मुसळधार पावसाने अखेर डाव साधला आणि रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावावर मृत्यूची दरड कोसळली. तसाच प्रकार पोलादपूर तालुक्यात देखील घडला आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना महाराष्ट्राला नव्या नाहीत. रायगड जिल्ह्याला तर मुळीच नाहीत. तरीही तळीये गावावर गुरूवारी कोसळलेला दु:खाचा डोंगर सहनशक्ती पलिकडचा आहे. या दुर्घटनेत किमान 38 लोकांचा मृत्यू झाल्याचे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत उघडकीस आले होते. तर आणखी काहीजण मातीच्या ढिगार्‍याखाली अडकले असावेत असा अंदाज आहे. त्यामुळे सध्यातरी मृत्यूचा आकडा निश्चित होऊ शकत नाही. पोलादपूर तालुक्यात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुसर्‍या घटनेत किमान 11जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात तळीये हे काहिसे दुर्गम भागातील गाव आहे. जेमतेम 35 ते 40 घरांची ही वस्ती. गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे गाव मुसळधार पावसात दरडीच्या ढिगार्‍याखाली नष्ट झाले. एवढी प्रचंड मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाला जाग नव्हती ही अतिशय संतापजनक बाब आहे. महाड परिसरामध्ये गेले दोन दिवस प्रचंड प्रमाणात पाऊस झाला ही वस्तुस्थिती आहे. अस्मानी संकटाला नाकारण्यात काहीच अर्थ नाही. ठिकठिकाणी पाणी साठल्यामुळे महाड परिसराचा संपर्कच तुटल्यासारखा झाला होता. महाडपासून अवघ्या वीसएक किलोमीटर अंतरावर असलेल्या तळीये गावावर जीवघेणी दरड कोसळली असल्याचे वृत्त कळल्यानंतर तब्बल बारा-पंधरा तास या गावाकडे एकही सरकारी अधिकारी फिरकला देखील नाही. तेथे सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे नेते पोहोचले. एनडीआरएफचे पथक आणि अन्य अधिकारी वर्ग दुपार टळता टळता तळीये गावात पोहोचला. तोवर तळीये गावातील दुर्दैवी जिवांच्या आप्तेष्टांनी सरकारी मदतीचा नाद सोडला होता. या दुर्घटनेत दगावलेल्या तळीये ग्रामस्थांच्या नातलगांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेची दाहकता कळली असती तर सरकारने वेगळी पावले उचलली असती. चिपळूण येेथे आलेल्या महाप्रलयाचे पाणी ओसरू लागल्यावर मदतकार्य करणारी पथके तेथे पोहोचली. आता येऊन कोणाला वाचवणार आहात असा खडा सवाल त्यांना नागरिकांनी केला. महापूर असो किंवा दरडी कोसळण्याच्या घटना, सरकारी यंत्रणेची दिरंगाई ठळकपणे समोर आली. जनतेच्या समस्यांप्रती अनास्था हा महाविकास आघाडी सरकारचा जणु स्थायी भाव झाला आहे. तळीये गावातील दुर्घटना घडून गेल्यावर तब्बल बारा तास या घटनेची पुरेशी माहिती ना सरकारी यंत्रणेला होती, ना प्रसारमाध्यमांना. या दुर्घटनेच्या ब्रेकिंग न्यूज वृत्तवाहिन्यांवर सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू झाल्या. निसर्गाच्या प्रकोपापुढे कोणाचेच काही चालत नाही. पावसा-पाण्यात मदतकार्यात अडथळे येणार हेही ओघाने आलेच. परंतु वेळीच दक्षता घेऊन सरकारी यंत्रणेने मदतकार्य सुरू केले असते, तर दुर्घटनाग्रस्तांचे शिव्याशाप तरी वाचले असते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply