Breaking News

सेवासमाप्तीमुळे संतप्त कंत्राटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील या कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन पुकारून शासनाचा निषेध केला. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जमलेल्या या कर्मचार्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांची भेट घेतली व आपले गार्‍हाणे मांडले.

कोविड काळात जेव्हा नियमित कर्मचार्‍यांची कमतरता भासत होती त्या वेळी सरकारने यांना विविध पदांवर कंत्राटी नेमणुका दिल्या, परंतु आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेला तेव्हा या कंत्राटी कामगारांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे. हळूहळू एकेका संवर्गातील कर्मचारी कमी केले जात आहेत. गरज सरो आणि वैद्य मरो अशा भूमिकेत सरकार आहे. सरकारने आम्हाला कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी या कर्मचार्‍यांची मागणी आहे.

त्यासाठी आज काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांच्या प्रतिनिधींनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांना कायम सेवेत घेण्यासाठी आग्रह धरला. याबाबतचा निर्णय सरकार पातळीवर घेतला जातो. या संदर्भात आपण वरिष्ठांशी चर्चा करू, असे डॉ. माने यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या मागणीबाबत कर्मचारी ठाम आहेत. अतिशय कठीण काळात जीवावर उदार होऊन आम्ही ही सेवा दिली आहे. कोरोना विरोधातील लढाईत आम्ही फ्रंट वर्कर म्हणून अग्रभागी होतो. सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या कंत्राटी कर्मचार्‍यांनी दिला आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply