Breaking News

पॅरालिम्पिकमध्ये भारताची भरारी

खेळांचा महाकुंभमेळा मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जपानची राजधानी टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धाही रंगली आणि तिचा रविवारी समारोप झाला. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी करीत एकूण 19 पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम भरारी आहे.

शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणार्‍या जगभरातील खेळाडूंसाठी ऑलिम्पिकपाठोपाठ पॅरालिम्पिक स्पर्धा होत असते. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटीच्या वतीने या खेळांचे आयोजन केले जाते. पॅरालिम्पिक हा शब्द पॅरलल अर्थात समांतर अशा अर्थाने घेतला जातो. पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा 1948 साली ब्रिटनमध्ये खेळविण्यात आली होती. काळानुरूप तिच्यात बदल होत गेले, पण त्यामागचा उद्देश आजही कायम आहे तो म्हणजे दिव्यांग खेळाडूंना जागतिक व्यासपीठ आणि प्रोत्साहन देणे. पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 विविध अपंगत्व स्वरूपांचा समावेश आहे. याचे तीन उपप्रकार आहेत. शारीरिक अपंगत्व, दृष्टी अपंगत्व आणि बौद्धिक अपंगत्व तसेच यातील काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात, मात्र काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव आहेत. यंदा टोकियोत ‘आम्हाला पंख आहेत’ अशी थीम असलेली पॅरालिम्पिक स्पर्धा रंगली. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अनेक देशांचे दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. भारताच्याही 54 खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग नोंदविला. यंदा भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली. भारताने सुरुवातीच्या दिवसांपासून अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली आणि अखेरच्या दिवशीही एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकत शेवट गोड केला. भारतीय खेळाडूंनी या वर्षी पाच सुवर्णपदके मिळवली. यातील दोन सुवर्णपदके बॅडमिंटन खेळातील आहेत. बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. निशाणेबाजीत भारताच्या अवनी लेखरा आणि मनीष नरवाल यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर पाचवे सुवर्णपदक हे भालाफेकपटू सुमित अंतिलने नवा जागतिक विक्रम नोंदवित आपल्या झोळीत टाकले. सुवर्णपदकांपाठोपाठ भारताने आठ रौप्यपदके प्राप्त केली. यामध्ये नेमबाज सिंहराज अधाना, थाळीफेकपटू योगेश कठुनियाने, उंच उडी खेळाडू निशाद कुमार, प्रवीण कुमार, मरियप्पन थंगावेलु, भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया, बॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि टेबल टेनिसपटू भाविना पटेल यांचा समावेश आहे. यातील यथिराज हे आएएस अधिकारी असून उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. याशिवाय भारताने सहा कांस्यपदकांचीदेखील कमाई केली. बॅडमिंटनपटू मनोज सरकार, नेमबाज अवनी लेखरा, सिंहराज अधाना, तिरंदाज हरविंदर सिंग, भालाफेकपटू सुंदर सिंह गुर्जरने आणि उंच उडीत शरद कुमार यांनी कांस्यपदक मिळविले. विशेष म्हणजे सुवर्णपदक जिंकणार्‍या अवनीने नंतर आणखी एक कांस्यपदक मिळवित दुहेरी कमाल केली. ऑलिम्पिकच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. नेमबाज अधाना यानेही रौप्यपदकानंतर कांस्यपदक मिळविले. या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली. यामागे त्यांची मेहनत तर आहेच, पण केंद्र सरकारचे पाठबळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रोत्साहनदेखील विसरता येणार नाही. यासाठी सर्वांचे अभिनंदन करायले हवे. जयहिंद! जय भारत!!

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply