Breaking News

पुरातन विहिरींचे जतन

लोकसहभागातुन पुरातन पायविहिरींचे जतन व संवर्धन करणारी महाराष्ट्र बारव मोहीम राजे प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्र बारव मोहीम ची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन काळे व मनोज सिंकर ह्या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेली ही मोहीम आता जोर धरू लागली आहे.या मोहिमेअंतर्गत पुरातन कालीन पायविहिरी ,बारव यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे, यात कर्जत तालुक्यातील दुर्गप्रेमी विकास झांजे या तरुणाने आता पर्यंत अकरा पायविहिरी शोधल्या असून त्यांचे राजे प्रतिष्ठान’ दुर्ग संवर्धन कर्जत विभागाकडून संवर्धन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राला खूप भव्य असा प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, मंदिरे, लेण्या, गढी, व अन्य वास्तू यांचे ज्याप्रमाणे जतन व संवर्धन केले जाते तसे भाग्य हे राज्यातील बारव, पायविहिरी यांच्या वाटेला आले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात भव्य आणि सुंदर बारव आहेत त्यापैकी बर्‍याच बारव आज दुर्लक्षित अवस्थेत आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रभर जनजागृती करून स्थानिक लोकांनी त्या बारवांचे जतन-संवर्धनासाठी व हा वारसा जपण्यासाठीच पुढाकार घ्यावा ह्या दृष्टीने ही मोहीम राबविली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक इतिहासकार, दुर्गप्रेमी, वारसा प्रेमींच्या पाठिंब्याने आणि सक्रिय सहभागाने आतापर्यंत महाराष्ट्र भर सुमारे 1475 (बारव/पायविहिरी/बावडी/घोडबाव/पोखरण/तळी/कुंड/पुष्कर्णी/पोखरण) या अंतर्गत यांची अचूक स्थळे गूगल मॅप केल्या आहेत. त्या  ुुु.ळपवळरपीींशिुशश्रश्री.लेा ह्या वेबसाईटवर पाहता येईल.

बारव….

माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेष महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.

जलसाठे तयार करण्यासाठी करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.

बारव म्हणजे काय?

बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर तर त्या योजना कुचकामी ठरतात, मात्र पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असून काळाची गरज आहे.

कर्जत तालुक्यातील बारव- कर्जत तालुक्यातील 11 पायविहिरी 2 कुंड व 1 तलाव यांचे गुगल मॅपिंग झालेले आहे.कोठीबे (2), अवसरे, दहिवली(नेरळ), डिकसळ, हालीवली, तळवली, टाकवे,  तांबस, भालीवडी, कर्जत-चौक हायवेवरील खोपोली फाट्याजवळ कुंड- मानिवली व वैजनाथ तसेच भिवपुरी येथील पुरातन तलावाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 75 पायविहिरीचें झाले गुगल मॅपिंग

महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 75 बारवांचे (पायविहिरी/बारव/कुंड/पुष्करणी) अंतर्गत गुगल मॅपिंग झाले आहे. ह्या मध्ये जिल्ह्यात अलिबाग तालुका (15),कर्जत तालुका (14), पनवेल तालुका  (12), माणगाव तालुका  (7), सुधागड तालुका  (5), रोहा तालुका(5), मुरुड तालुका(5), श्रीवर्धन तालुका (5), महाड तालुका (4), खालापूर तालुका(3) ह्याचा समावेश आहे. ह्या कार्यात स्थानिक ऐतिहासिक वारसा प्रेमी मनोज तिथे, सौरभ घरात, रामजी कदम, सिद्देश सुर्वे, चेतन फावडे, मयूर कडू, सागर मुंढे, देवेंद्र मयेकर, ओंकार नाईक, रोहित देशमुख, यांसह कर्जत तालुक्यातील दुर्गप्रेमी विकास झांजे ह्यांनी पुढाकार घेऊन आपआपल्या भागातल्या बारव/पायविहीरींचा शोध घेऊन त्यांच्या माहितीच्या आधारे गुगल मॅपिंग करण्यात आल्या.

ह्या मोहिमेची ध्येय म्हणजे दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई वर मात करणे, ऐतिहासिक वारसाचं जतन करून पर्यटन वाढवणे, प्राचीन व्यापारी मार्गांचा अभ्यास अशा विविध प्रकारची ध्येय ह्या मोहिमेद्वारे साकार करायची आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर गुगल मॅपिंग झालेल्या 1475 बारवांचे पुढील वर्षापासून टप्पा टप्प्याने दस्त ऐवजीकरण करण्यात येईल.मात्र त्या त्या बारवांची निर्मिती ही वस्ती करून राहणार्‍या ब्राम्हण लोकांनी आपल्या कुटुंबासाठी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.या कुटुंबांनी आपल्या कुटुंबाची पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी यासाठी हा प्रयत्न केला होता.मात्र बहुतेक त्या त्या गावातील बहुतेक ब्राम्हण लोकांनी देश स्वातंत्र होत असताना गावातून शहराकडे स्थलांतरण केले आणि त्यामुळे त्या विहिरींकडे दुर्लक्ष होऊ लागले.आणि जिल्ह्यातील अशा पुरातन विहिरी नामशेष होऊ लागल्या होत्या. आज त्याच बारवांची शोध मोहीम त्यांचे संवर्धन करण्याचा एक स्तुत्य उपक्रम त्या बारवांना वाचविणार आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply