रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप) मुख्यालय असलेली शिवतीर्थ ही इमारत केवळ प्रशासकीय इमातर नसून ती रायगडच्या राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेली एक ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे. अनेक दिग्गजांची राजकीय कारकिर्द या इमातीत घडली आहे. ही इमतारत धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता ही इमारत पाडावी लागणार आहे. त्यादृष्टीने इमारत खाली करण्याची कार्यवाही राजिप प्रशासनाने सुरू केली आहे. इमारत पूर्ण न पाडता चारपैकी वरील तीन म्हणजे चौथा व तीसरा मजाला रिकामा केला जाणार आहे. कोरोडो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली दालने तोडावी लागणार आहेत. ही इमारत धोकादायक असल्याचे माहीत असतानादेखील त्यात अंतर्गत सुशोभीकरणावर खर्च करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत धोकादायक असताना त्यावर खर्च करून तो वाया घालवणार्या राजिपचा वरचा मजला रिकामाच आहे, असेच म्हणावे लागेल. राजिपच्या विविध विभागांची कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी होती. ही सर्व कार्यालये एकाच इमारतीमध्ये असावीत, असे ठरविण्यात आले. इमारत कुठे असावी यावरदेखील वाद होते. जिल्ह्याचे मुख्यालय असल्यामुळे अलिबागमध्येच ही इमारत असावी, असे काहींना वाटत होते. तर मध्यवर्ती ठिकाण म्हणून राजिपची मुख्य प्रशासकीय इमातरत पेण येथे असावी, असे काही लोक म्हणत होते. राजिपचे तत्कालीन अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेची मुख्य प्रशासकीय इमारत अलिबाग येथे बांधण्याचा निर्णय घेताला. त्याद़ृष्टीने धडाडीने पावले उचलली. इमारतीचे बांधकाम 1978 मध्ये सुरु करण्यात आले. 1982 साली शिवतीर्थ ही इमारत बांधून पूर्ण झाली. एक भव्य अशी ही इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या इमारतीच्या दर्शिनी भागात चित्रशिल्प लावण्यात आले. तीला शिवतीर्थ हे नाव देण्यात आले. गेली 42 वर्षे या इमारतीतून जिल्ह्याचे कामकाज सुरू आहे. या इमातीत रायगड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची कारकिर्द घडली. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले काही सदस्य विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. काही विधान परिषदेचे सदस्य झाले. मंत्री झाले. या सर्वांनी आपल्या कामाचा ठसा तिथेही उमटवला. रायगड जिल्हा परिषदेत काम केल्याच्या अनुभवाचा फायदा या सदस्यांना झाला. चांगले अधिकारी येथे आले. रायगड जिल्हा परिषदेत काम केल्यामुळे हे अधिकारी राज्यात इतर जिल्ह्यात चांगले काम करू शकले. रायगड जिल्हा परिषद हे एक राजकीय विद्यापीठच आहे. त्या विद्यापीठाचे मुख्यालय म्हणजे दिमाखात उभे असलेले शिवतीर्थ. गेली 42 वर्ष ही इमारत उभी आहे. या प्रदीर्घ कालावधीत इमारतीच्या अंतर्गत दालनात वारंवार बदल झाले. सत्ता बदलली की, दालनांचे नूतनीकरण, अधिकार्यांच्या दालनाचे नूतनीकरण होत असते. आतापर्यंत नुतनीकरणावर करोडो रुपये खर्च झाले आहेत. 2018 साली पंचायत राज समिती रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर आली होती. तेव्हा या समितीने शिवतीर्थचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या चार वर्षात अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या. करोडो रुपये त्यावर खर्च करण्यात आले. मागील पाच वर्षात या इमारतीमध्ये अंतर्गत दुरुस्तीसाठी तसेच दलानांमधील फर्नीचरसाठी जितका निधी खर्च करण्यात आला आहे, त्याच पैशात नवीन इमारत उभी राहिली असती. जर 2018 साली पंचायत राज समितीने या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करून घ्यायला सांगितले असताना त्यासाठी इतकी वर्षे का घालवली. अंतर्गत दुरुस्त्या करण्यासाठी इतका खर्च का केला. हे अनाकलनीय आहे. शिवतीर्थ ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल 11 नोव्हेंबर 2021 राजिप प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून, शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या राजिपच्या सर्वसाधारण सभेत राजिपचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिवतीर्थ पाडावे लागणार असल्याची माहिती दिली होती. आता ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आल्यामुळे या इमारतीत कोणतेही बांधकाम करू नये, कोणत्याही विभागाचे किंवा पदाधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरण किंवा सुशोभीकरण करू नये, अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. इमारत पूर्ण धोकादायक आहे. त्यामुळे ही इमारत पूर्ण पाडणे अपेक्षीत होते. पंरतु तसे न करता या इमारतीचे वरचे दोन मजले रिकामे करण्याचा निर्णय राजिप प्रशासनाने घेतला आहे. वाढवलेल्या चौथ्या व तीसर्या मजल्यावरील कार्यालये इतर इमारतींध्ये हलविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कार्यालये इतरत्र हलविल्यास तेथे माणसांचा वावर कमी होईल. फाईली, कापाट, फर्नीचर यांचे वजन कमी होईल. दोन मजल्यांवरील वजन कमी झाल्यामुळे इमारतीवरील भार कामी होईल. त्यामुळे इमारतीला असलेल्या धोका कमी होईल, असे सांगितले जात आहे. इमारत पाडली तर ती पूर्ण पडेल. वरचे दोन मजलेच पडतील असे नाही. त्यामुळे वरचे मजले रिकामे करण्यापेक्षा शिवतीर्थ पूर्णपणे रिकामी करायला हवी. केवळ वरचे माजले रिकामे करण्यास सांगणार्यांचा वरचा मजला रिकामा असावा असेच वाटते.
-प्रकाश सोनवडेकर