राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने नवी नियमावली जाहीर केली, जी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
नववर्ष सुरू होऊन दहा दिवस व्हायला आले तरी परिस्थिती मागील वर्षीसारखीच आहे. सर्वसाधारणपणे जुने वर्ष सरून नव्या वर्षाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जण त्यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणे दैनंदिन जीवनात बदल, सुधारणा करून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करीत असतात. कोरोनामुळे मानवाचे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे, मात्र वेगळ्या प्रकारे. आता नवे काय करायचे असेल तर ते कोरोना परिस्थिती पाहून किंबहुना त्यालाच अनुसरून करावे लागत आहे. हा कोविड विषाणू सलग दोन वर्षे आपल्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. कोरोना संसर्ग कधी वाढतो, तर कधी कमी होतो, मात्र तो पूर्णपणे संपुष्टात काही होत नाहीए. परिणामी यात हार माणसाचीच होताना दिसत आहे. गतवर्षीच्या अखेरीस कोरोनाने डोके वर काढले. सोबतच ओमायक्रॉन या नव्या विषाणूनेही शिरकाव केला. हा नवा विषाणू घातक मानला जात होता, परंतु त्याचा फैलाव वेगाने व मोठ्या प्रमाणात आतापर्यंत तरी झालेला नाही. उलट मूळचाच कोरोना विषाणू पुन्हा झपाट्याने पसरत आहे. देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी म्हणजेच पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही आणि रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत तर कुणालाही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. सरकारी कार्यालयांची दारे अभ्यगतांसाठी बंद करण्यात आली आहेत. लग्न समारंभ तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी आहे, तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार. मॉल्स, व्यापारी संकुले रात्री 8पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच उपाहारगृहांमध्येही 50 टक्केच प्रवेशाला परवानगी असेल. शाळा व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलतरण तलाव, पर्यटनस्थळे, मैदाने, उद्याने बंद राहणार. प्राणीसंग्रहालय, किल्ले, मनोरंजन पार्क अशी सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. व्यायामशाळा, ब्युटीपार्लर, केशकर्तनालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याशिवाय अन्य काही निर्बंध आहेत. या निर्बंधांमध्ये धार्मिक स्थळे आणि दारुच्या दुकानांचा उल्लेख नाही. याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, गर्दी होत असेल तर दारूची दुकानेही बंद करावी लागतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळांबाबतही टप्प्याटप्याने निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे. राज्यात राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढेपर्यंत, तसेच हॉस्पिटलमध्ये बेड्स कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक राज्यात कोणताही मोठा निर्णय घेताना सरकारने सर्वपक्षीयांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भिन्न विचारधारा आणि तोंडेही तीन दिशेला असलेले सरकार अनेक बाबतीत गोंधळलेले असून योग्य वेळी योग्य निर्णय घेताना कमी पडते. त्यामुळे जनतेची मात्र परवड होत आहे.