Breaking News

रेल्वे स्थानकात रॅम्पचा जिना बनविण्याची मागणी

आधार अंध-अपंग संस्थेकडून रेल्वेला निवेदन

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडील सर्व रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी रॅम्पचे जिने बनविण्याची मागणी आधार अंध-अपंग संस्थेने केली आहे. कर्जत, नेरळ, शेलू, भिवपुरी आणि वांगणी रेल्वे स्थानकांतून अपंग प्रवासी दररोज प्रवास करीत असून, त्यांची 43 पायर्‍यांचा पादचारी पूल पार करताना दमछाक होत आहे. नेरळ, वांगणी, कर्जत या परिसरात राहणार्‍या अपंग आणि अंध लोकांसाठी आधार अंध-अपंग संस्था काम करीत आहे. त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापकांना पत्र देऊन वांगणीपासून कर्जतपर्यंत असलेल्या रेल्वे स्थानकांत रॅम्प जिने बसविण्याची मागणी केली आहे. या मागणीची निवेदने या संस्थेचे पदाधिकारी सर्व रेल्वे स्थानकांत जाऊनही सादर करीत आहेत. नेरळ येथील मध्य रेल्वेचे अधिकारी शिरीष कांबळे, स्टेशन प्रबंधक जी. एस. मीना यांना संस्थेतर्फे निवेेदन देण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वझरकर, सचिव सुनील राजे, सहसचिव विकास कुलकर्णी तसेच बन्सीलाल जाधव, संजय लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वांगणी रेल्वे स्थानक परिसरात अंध आणि अपंगांची वसाहत आहे, तर कर्जत आणि नेरळ या भागातदेखील किमान एक हजार अपंग लोक राहत असून ते नेहमी रेल्वेने प्रवास करीत असतात, मात्र मध्य रेल्वेच्या वांगणीपासून कर्जतपर्यंतच्या स्थानकात  कुठेही अपंग प्रवाशांसाठी रॅम्प असलेले जिने नाहीत. त्यामुळे अपंग प्रवाशांना फलाटावर पोहचताना आणि एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारीरिक कसरत करावी लागते, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply