Breaking News

एलआयसीचा आयपीओ अनेक विक्रम करण्यास सज्ज

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

येत्या एक फेब्रुवारीला सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प आणि त्या पाठोपाठ देशातील सर्वात मोठा ठरू शकेल असा एलआयसीचा येणारा आयपीओ, या मोठ्या आर्थिक घटना आहेत. एलआयसीच्या आयपीओने सरकारी तिजोरीत चांगली भर तर पडेलच, पण गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याची क्षमता असलेल्या कंपनीत गुंतवणुकीची एक संधी मिळेल.

भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते आहे, त्याच्या तारखा आणि इतर सर्व माहिती नेमकेपणाने पुढील आठ दिवसांत आपल्यासमोर असेल. हा आयपीओ म्हणजे एलआयसीचे खाजगीकरण आहे, ते व्हावे की न व्हावे, तो या वर्षी येणार की पुढील वर्षी, त्यातून सरकारच्या तिजोरीला खरोखरच किती हातभार लागणार, एलआयसीच्या पॉलिसीधारकांना त्याचा किती लाभ मिळणार, शेअर बाजारात नोंद झाल्यावर त्यातून गुंतवणूकदारांना किती फायदा मिळणार, त्यानंतर एलआयसीच्या कामकाजात काय बदल होणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्याची उत्तरे मिळण्याची वेळ जवळ आली आहे. सरकारच्या आताच्या इराद्यानुसार सर्व घडले तर आगामी अर्थसंकल्प आणि एलआयसीचा आयपीओ, अशा दोन मोठ्या घटना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एकाच वेळी पाहायला मिळतील. देशाच्या आर्थिक क्षेत्रातील आणि भांडवली बाजारातील ही एक मोठी घटना असेल.

सर्वांत मोठी गुंतवणूक संस्था

शेअर बाजारात गुंतवणूक करून पॉलिसीधारकांना फायदा मिळवून देणार्‍या एलआयसीचे पाच ते 10 टक्केही खाजगीकरण करू नये, असे म्हणणे हा दुटप्पीपणा आहे. सध्या शेअर बाजारातील कंपन्यांमधील तब्बल चार टक्के हिस्सा एलआयसीकडे आहे. या नात्याने ती भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक संस्था आहे. अनेक सरकारी योजना राबविण्यासाठी सरकार एलआयसीचा वापर करते, पण जेव्हा ती कंपनी शेअर बाजाराचा भाग होईल, तेव्हा सरकारला त्या विषयीच्या धोरणाला काही मर्यादा येतील. शिवाय, एलआयसीला आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल. जीवन विमा उद्योगात खाजगी कंपन्यांना प्रवेश दिला गेला, तेव्हापासून म्हणजे गेली 21 वर्षे एलआयसी खाजगी विमा कंपन्यांशी स्पर्धा करते आहे. त्यापूर्वी एलआयसीला स्पर्धा नव्हती. त्याचा अर्थातच एलआयसीला फायदा होत गेला. गेली दोन दशके जेव्हा तिच्या स्पर्धेत खाजगी कंपन्या आल्या, तेव्हा एलआयसीची कार्यक्षमता वाढली. त्यामुळेच तब्बल 66 टक्के जीवन विम्याचा हिस्सा अजून तिच्याकडे आहे. एवढा मोठा कारभार असलेली कंपनी भांडवल बाजारात येणार, याचे म्हणूनच औत्सुक्य निर्माण झाले आहे.

देशातील सर्वांत मोठा आयपीओ

भांडवली बाजारात पेटीएमचा आयपीओ 16 हजार कोटी रुपयांचा होता, त्या खालोखाल कोल इंडिया (15 हजार 500 कोटी), रिलायन्स पॉवर (11 हजार 700 कोटी), न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स (9 हजार 600 कोटी) यांचा क्रमांक लागतो. या पार्श्वभूमीवर एलआयसीचा आयपीओ 50 हजार कोटींचा असेल, म्हणजे तो किती मोठा आहे, याची कल्पना येते. गेल्या 12 महिन्यांत विक्रमी संख्येने आयपीओ बाजारात आले आणि विक्रमी पैसा उभा राहिला. आता जेव्हा एलआयसीचा आयपीओ येईल तेव्हा गुंतवणूकदारांच्या हातात तेवढा पैसा असेल का, अशी चर्चा केली जाते आहे. या आयपीओला उशीर होण्याचे कारण या कंपनीचे मूल्यमापन करताना आलेल्या अडचणी सांगितल्या जातात. एलआयसीकडे असलेली जीवन विमा क्षेत्रातील उत्पादने, देशाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या जागा आणि इमारती, तिच्या उपकंपन्या, या सर्व मालमत्तेचे मूल्य ठरविणे अवघड आहे. अखेर ते पूर्ण झाले. ते 10 लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले असा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात दोन हजार 901 कोटी रुपये नफा मिळविणारी ही कंपनी आयपीओद्वारे सरकारला 50 हजार कोटी रुपये मिळवून देईल, असा अंदाज आहे.

पॉलिसीधारकांसाठी विशेष कोटा

आयपीओला चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करते आहे. 30 कोटी पॉलिसीधारकांना या आयपीओत सामील होता यावे, यासाठी त्यांना विशेष कोटा तयार करण्यात आला असून गेले महिनाभर त्याच्या तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. पॉलिसीधारकांनी एलआयसीकडे पॅन कार्डची नोंद करावी आणि डिमॅट खातेही काढून घ्यावे, यासाठी केल्या जात असलेल्या जाहिराती हा त्याचाच एक भाग आहे. परदेशी आर्थिक संस्थांनी या आयपीओत उतरावे, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.आयपीओची तयारी म्हणून कंपनीतर्फे काही आकडेवारी गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात आली, हाही त्या प्रयत्नांचाच भाग म्हणता येईल. उदा. ऑनलाईन सेवा पुरविण्यात एलआयसी मागे होती, पण आता म्हणजे 2020-2021मध्ये 72.35 टक्के व्यवहार आणि 64.19 टक्के हप्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले, असे सांगितले गेले. एलआयसीच्या वेबसाईटमध्ये गेले काही दिवस सुधारणा करण्यात येत आहेत. तब्बल 24 कंपन्यांच्या स्पर्धेत एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षांत चांगला व्यवसाय केला असून अशा पार्श्वभूमीवर या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सरकारला वाटणे साहजिक आहे. गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांनी या आयपीओचा अवश्य लाभ घेतला पाहिजे.

एलआयसीच्या आयपीओच्या निमित्ताने…

एआयए ही हाँगकाँगची विमा कंपनी सर्वाधिक बाजारमूल्य असलेली विमा कंपनी आहे. तिचे मूल्य 139.23 अब्ज डॉलर आहे. एलआयसीचे मूल्य आज 133 अब्ज डॉलर गृहित धरले तर ती जगातील तिसर्‍या क्रमांकाची विमा कंपनी ठरेल.

एलआयसी सध्या 36.7 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करते. जे भारताच्या जीडीपीच्या 18 टक्के आहे.

एलआयसीची मालमत्ता 463 अब्ज डॉलर इतकी असून ती जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे.

एलआयसीच्या 11 हजारांपेक्षा अधिक शाखांमध्ये तीन लाखांपेक्षाही अधिक कर्मचारी काम करत असून एजंटांची संख्या 24 लाख इतकी आहे.

एलआयसीच्या आयपीओमुळे ही भारतातील दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकाचे बाजारमूल्य असलेली कंपनी ठरेल. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज (17.17 लाख कोटी रुपये) ही पहिल्या तर टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (14.67 लाख कोटी रुपये) ही दुसर्‍या क्रमांकाचे बाजारमूल्य असलेल्या कंपन्या आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply