Breaking News

काँग्रेसमधील खदखद

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे, मात्र काही ना काही  कारणांवरून या आघाडी सरकारमध्ये धुसफूस दिसून येते. एकेक राज्य काँग्रेसच्या हातून निसटून जात असताना या पक्षाने विचारधारा, ध्येय-धोरणे बाजूला सारून महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेचा वाटा स्वीकारला, मात्र इथेही परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही.

भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस हे जळते घर आहे, असे म्हटले होते. ते आजवर सातत्याने पहावयास मिळत आले आहे. एकेकाळी देश चालविणारा आणि सर्वांत मोठा पक्ष राहिलेल्या काँग्रेसची अवस्था सध्या अतिशय बिकट आहे. हा पक्ष सातत्याने निवडणुकांमध्ये पराभूत होत आहे. अनेक नेते, पदाधिकारीही ‘हाता’ची साथ सोडून इतर पक्षांमध्ये स्थिरस्थावर होऊ लागले आहेत. याला पक्षनेतृत्वाची कचखाऊ भूमिका, अनिर्बंध कारभार कारणीभूत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे गटातटाच्या राजकारणाची कीड हा पक्ष कधीच दूर करू शकला नाही. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभवानंतर काँग्रेस सन्मानाने विरोधी पक्षाचा दर्जादेखील कधी गमावून बसली हे त्यांनादेखील कळले नाही. त्याचबरोबर विविध राज्यांच्या तसेच स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसच्या हाराकिरीची मालिका सुरूच आहे. बरं एवढे होऊनही ही मंडळी सुधारायला नाहीत. काँग्रेस पक्षाध्यक्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सोनिया गांधी यांना वरपरत्वे मर्यादा आल्या आहेत, तर राहुल गांधींचे बालीशपण संपलेले नाही. मुख्य म्हणजे गांधी घराण्याबाहेर पक्षाध्यक्षपद देण्यास हे तयार नाहीत. म्हणून जी-23 गटाने मध्यंतरी उठाव केला होता, मात्र त्यांच्यातही आलबेल नाही. जी स्थिती वरिष्ठ पातळीवर तशीच खालच्या स्तरावर. पक्षाच्या विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकार्‍यांमध्ये सुंदोपसुंदी दिसून येते. याच गटबाजीतून मध्य प्रदेश काँग्रेसकडून निसटले. पंजाबमध्ये मानहानीकारक हार पदरी आली, तर राजस्थानही हातून जाण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर असला तरी म्हणावे तसे चांगले चित्र नाही. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज आहेत. बडे नेते मंत्रिपदात खुश असले तरी तीन पक्षांच्या साठमारीत आमदारांची मात्र गोची होत आहेत. महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्या, असमान निधीवाटप यावरून काँग्रेस आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. ती अधूनमधून समोर येत असते. अशाच प्रकारे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची खदखद बाहेर आली आहे. आदिवासींची कामे होणार नसतील तर आमदारकीचा उपयोग काय? मी राजीनामा देऊन टाकेन, असा घरचा आहेर आमदार खोसकर यांनी दिला आहे. राज्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. अलीकडेच काँग्रेसच्या 18 आमदारांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गार्‍हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वेळी राहुल यांची भेट काही झाली नाही, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल काँग्रेसच्या आमदारांना नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ही खदखद कधी संपणार हा एक गहन प्रश्न आहे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply