Breaking News

रायगडात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात

अलिबाग : प्रतिनिधी

हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता.

हर हर महादेवाच्या नामघोषाने शिवमंदिरे दणाणून गेली होती. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर (ता. श्रीवर्धन) येथील मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मंगळवारपासून सुरू झाला आहे. तो चार दिवस चालणार आहे. जिल्हयातील शिवमंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अलिबाग शहरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिर, आंग्रेकालीन शिवमंदिर, उंच डोंगरावर असलेले श्रीक्षेत्र कनकेश्वर, रांजणखार येथील भुवनेश्वर, अलिबागनजिक गोकुळेश्वर, सिध्देश्वर, महाडचे श्री विरेश्वर, चौलमधील रामेश्वर, सोमेश्वर, गोरेगाव येथील श्री मल्लिकार्जून मंदिर, पेणचे श्री पाटणेश्वर, नवगाव येथील श्री बोरेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी होती. शिवपिंडीवर दुग्धाभिषेक, बेलपत्र वाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात गावागावातील शिवमंदिरामध्ये पहाटेपासूनच ओम नमः शिवायचा गजर सुरू झाला. सफेत वस्त्र परिधान करून ओलेत्याने शिवदर्शन घेणार्‍या भाविकांची संख्याही मोठी होती. मंदिरांमध्ये रूद्राभिषेक, अभिषेक, पूजा, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्याचबरोबर महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. पूजेसाठी लागणार्‍या साहित्याची दुकाने मंदिरांबाहेर थाटण्यात आली होती. शिवमंदिरांमध्ये शिवनामाचा गजर केला जात होता. ओम नमः शिवाय बम बम भोले चा जयघोष शंखनादात सुरू होता.

महाशिवरात्री निमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भजन, कीर्तन, पूजाअर्चा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग शहरातील जोगळेकर नाका येथे महाशिवरात्रनिमित्त कमळ नागरी पतसंस्थेने अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. नामांकित भजन मंडळांनी आपल्या सुश्राव्य भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply