पनवेल : बातमीदार, वार्ताहर – नशा करतो असे बोलून 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पाकिटातून चार हजार रुपये घेऊन दोन व्यक्ती पसार झाले आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा येथील बाळू श्रीपती बडेकर हे त्यांच्या रेशन कार्डच्या कामाकरिता तहसील कार्यालय पनवेल येथे आले होते. तेथील काम पूर्ण करून ते गावी जाण्याकरता पायी चालत एसटी स्टॅन्ड कडे निघाले असताना एक काळीपिवळी रिक्षा त्यांच्या शेजारी येऊन थांबली व त्यातील रिक्षाचालकाने बडेकर यांना साहेब बोलावतात, असे सांगितले. बडेकर रिक्षा जवळ गेले असता पाठीमागे बसलेल्या सीटवरील अनोळखी व्यक्तीने तू नशा करतो असे बोलून आत ये असे बोलला.
या वेळी बडेकर रिक्षामध्ये जाऊन बसले असताना अनोळखी व्यक्तीने त्यांचे खिसे तपासले आणि त्यांच्या हातातील पेपर बघितले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाकीट काढून त्यातील चार हजार रुपये घेतले. त्यानंतर बडेकर रिक्षांमधून खाली उतरले व ते अनोळखी व्यक्ती रिक्षांमधून निघून गेले. काही वेळाने बडेकर यांनी पाकीट उघडून पाहिले असता त्यातील चार हजार रुपये त्यांना सापडून आले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.