पनवेल ः वार्ताहर
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळी व धुलिवंदनसाठी पनवेेल परिसरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगांनी तसेच निरनिराळ्या आकाराच्या पिचकार्यांनी सजल्या आहेत. भारतीय परंपरेत महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पनवेल शहर परिसर स्थानिक आगरी, कोळी भूमिपुत्रांचा असल्याने होळीचा सण परंपारिक पद्धतीने येथील भूमिपुत्रांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शहर व गावठाण भागात होळी पेटवत त्याभोवती प्रदक्षिणा मारून प्रार्थना केली जाते. होळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. मागील दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे अन्य सणांप्रमाणेच या सणालाही मर्यादा आल्या होत्या, परंतु आता हे सावट दूर झाले असून होळीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. होळीनंतर दुसर्या दिवशी धूलिवंदन असल्याने दोन दिवस रंगाची उधळण करीत नागरिक आनंदोत्सव साजरा करतात. यात नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. दरम्यान, होळीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह आहे.