पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चोळई गावाच्या हद्दीत ट्रक कोसळल्यानंतर सांडलेल्या तूस आणि धान्यावर पावसाचे पाणी पडल्याने प्रचंड प्रमाणात दूर्गंधी पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दूर्गंधीमुळे अनेक वाहनचालकांना ओकारीसाठी उबळ येत असल्याचे दिसून आले आहे.
पोलादपूर शहरापासून केवळ दीड किमी अंतरावरील कशेडी घाटातील चोळई गावात यंदा अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वारंवार डोंगरातून लालमातीचे ढिगारे व दरडी कोसळू लागल्या आहेत. गेल्या महिन्यामध्ये चोळई येथील घाट रस्त्याच्या उतारावर भाताचा तूस वाहून नेणारा ट्रक कोसळला होता. या तूसासह कुजलेल्या तांदूळामुळे गेल्या काही दिवसांपासून कशेडी घाट उतरताना तसेच घाटात प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात दूर्गंधी निर्माण झाली आहे. वाहनचालकांना या घाणेरड्या वासामुळे ओकारीची उबळ येत असून स्थानिक ग्रामस्थदेखील दूर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. सध्या उन-पावसाचा खेळ सुरू असल्याने सुकलेल्या तूस आणि तांदूळांवर पुन्हा पाऊस पडल्यानंतर दूर्गंधी सुटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.