पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताने 400 अब्ज डॉलर्सचे निर्यातीचे ध्येय गाठले आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवते. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे, असे सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा 100 अब्ज, कधी 150 अब्ज होता. आज भारत 400 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असे मानले जात होते की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादने विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलने हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार आहे, असे सांगून पंतप्रधान मोदींनी म्हटले की, आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ 22 हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख 40 हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधले जाऊ शकतात. काही जुन्या तलावांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, तर काही नवीन बांधले जाऊ शकतात. या दिशेने तुम्ही नक्कीच काही प्रयत्न कराल याची मला खात्री आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
आपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी जल मंदिर योजनेने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे याचा मला आनंद आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
नाशिकच्या चंद्रकिशोर पाटीलांसह उस्मानाबादेतील हातमाग वस्तूंचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत कौतुक केले आहे. चंद्रकिशोर पाटील गोदावरी नदीच्या काठावर उभे राहून लोकांनी नदीत कचरा टाकू नये म्हणून प्रयत्न करतात. यासाठी ते दिवसभरातील खूप वेळ खर्च करतात, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले तसेच उस्मानाबादच्या हातमाग वस्तूंचा उल्लेख करीत या वस्तू परदेशात निर्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.