भारत-फ्रान्सदरम्यान बंदर व्यापार संबंध होणार मजबूत
उरण : प्रतिनिधी
फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी रविवारी (दि. 27) जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) या भारतातील प्रमुख कंटेनर बंदरास भेट दिली. या भेटीमुळे भारत-फ्रान्स यांच्यातील जमीन, हवाई आणि सागरी वाहतूक व बंदर व्यापार संबंध अधिक मजबूत होणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान फ्रान्सच्या परिवहनमंत्र्यांनी ब्ल्यू इकॉनॉमीच्या संयुक्त मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करून भारतीय बंदरे आणि लॉजिस्टिक व्हॅल्यू चेन विकसित करण्यासाठी फ्रेंच कंपन्या देत असलेल्या योगदानावर चर्चा केली.
जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी व इतर फ्रेंच प्रतिनिधींचे पारंपरिक स्वागत केले. त्यांच्याशी संवाद साधताना श्री. वाघ म्हणाले की, जेएनपीए पायाभूत सुविधा व सागरी वाहतूक सुविधा विकसित करताना शाश्वत उपायांवर भर देते व प्रोत्साहन देते, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक कार्यामध्ये अर्थपूर्ण सहभाग सक्षम होतो. जेएनपीएने विविध मल्टी-मॉडल सुविधा आणि प्रकल्प विकसित केले आहेत, ज्याचा आमच्या ग्राहकांना आणि भागधारकांना लाभ होत आहे.
भारत-फ्रेंच संबंधांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, भारत व फ्रान्स या दोन्ही देशांचा सागरी व बंदर क्षेत्रातील प्रगतीशील उत्कर्षामध्ये रस असून दोन्ही देश व्यापारी भागीदार आहेत. जेएनपीए प्राधिकरणाने फ्रान्सच्या प्रतिनिधी मंडळासमोर सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांची माहिती दिली. प्रतिनिधी मंडळाने प्रत्यक्ष बंदर क्षेत्राचा दौरा केला व बंदरातील एकूण कामकाज आणि बंदरातील अद्ययावत विकासकामांची व सुविधांची माहिती घेतली. आपल्या भेटीदरम्यान फ्रान्सचे परिवहनमंत्री जॉन बातिस्ते जेब्बारी यांनी जेएनपीएच्या हरित बंदर उपक्रमांची व शाश्वत विकासाच्या दिशेने केल्या जात असलेल्या उपायांची प्रशंसा केली.