शारजा ः वृत्तसंस्था
नामिबिया आयर्लंडचा आठ गडी आणि नऊ चेंडू राखून धुव्वा उडवत पहिल्याच ट्वेन्टी-20 विश्वचषकात अव्वल-12 फेरी गाठण्याचा पराक्रम केला. डावखुरा गोलंदाज जॅन फ्रॅलिंकच्या (3/21) भेदक मार्यामुळे आयर्लंडला 8 बाद 125 धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली. प्रत्युत्तरात कर्णधार जेरार्ड इरास्मस आणि डेव्हिड वीज यांच्या योगदानामुळे नामिबियाने आयर्लंडने दिलेले 126 धावांचे लक्ष्य 18.3 षटकांत गाठले. इरास्मसने चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 चेंडूंत 53 धावा केल्या, तर वीसने 14 चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद 28 धावा केल्या. त्याने डावाच्या 15व्या षटकात सलग चेंडूंत दोन षटकार ठोकून सामना नामिबियाच्या दिशेने फिरवला. वीसने 22 धावांत दोन बळीही घेतले. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या संघाचे क्रिकेटविश्वात कौतुक होत आहे.
श्रीलंकेने नेदरलँड्सला गुंडाळले
शारजा ः टी-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने नेदरलँड्सचा पालापाचोळा करीत आठ गड्यांनी सहज विजय नोंदवला. या विजयासह श्रीलंका ग्रुप एमध्ये तीन सामन्यात तीन विजयासह अव्वल स्थानी आहे. शारजा मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या मार्यासमोर दुबळा नेदरलँड्स संघ टिकाव धरू शकला नाही. 10 षटकांत अवघ्या 44 धावांवर नेदरलँड्स सर्वबाद झाला. लंकेकडून लहिरू कुमारा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने दोन गडी बाद करून विजय साकारला.