नागोठणे : प्रतिनिधी
रायगड जिल्हा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग संघटनेचा दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची दि. 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्या जागतिक आयसीएफ कॅनॉईंग स्प्रिंट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प दि. 12 ते 21 मे पर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक सेंटर, हंगेरी येथे होणार आहे. पोलंड येथे होणार्या जागतिक स्पर्धेच्या व यानंतर होणार्या ऑलम्पिक स्पर्धेच्या कॅनॉईंगच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे व तेथूनच भारतीय संघ पोलंडला रवाना होणार आहे.
या जागतिक स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातील फक्त तीन खेळाडू सहभागी होणार असून त्यातून महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून देविदासची निवड होऊन तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कॅनॉईंग अॅण्ड
कयाकिंग हा खेळ ऑलम्पिकमध्ये असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तो मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. देविदास पाटील दिव्यांग असून तो देवळोली (रसायनी) येथे राहतो. पाटीलने बॉडी बिल्डर, व्हिलचेअर तलवारबाजीतसुद्धा उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
रायगड तसेच महाराष्ट्रातून बोटिंग स्पोर्ट्स या खेळामध्ये प्रथमच एक खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरला आहे. जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अडीच लाख खर्च येणार आहे. देविदास पाटील हा शेतकरी कुटुंबातील असून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने रायगडाच्या या खेळाडूला दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन अँम्युचर लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने संदीप गुरव यांनी केले आहे.