एक लाख 87 हजारांच्या गांजासह तिघे अटकेत
पनवेल ः वार्ताहर
मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धडक कारवाई करीत एक लाख 87 हजार 310 रुपयांचा गांजा, रोख रक्कम व विक्रीसाठी वापरणयात येणारे वाहन हस्तगत केले आहे. त्याचपमाणे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देसलेपाडा, डोंबिवली पूर्व येथील महाबीर अपार्टमेंटमध्ये काही जणांनी गांजा हा अमली पदार्थाचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार सपोनि. सुनिल तारमळे व त्यांचे पथक रवाना करण्यात आले होते. या पथकाने महावीर अपार्टमेंट, रूम नं. 302, एकतानगर, टेसलेपाडा, डोंबिवली-पूर्व येथे छापा घातला असता, घरात मयुर मधुकर जडाकर वय 25, व अखिलेश राजन धुळप वय 26 हे दोघे असल्याने त्यांना मालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख 87 हजार 310 रुपयांचा 5 किलो 900 ग्रॅम वजानाचा गांजा तसेच मोबाईल फोन, रोख रक्कम व गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हा गांजा सुनिल उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा व त्याच्या साथीदारांकडून शिरपुर येथून विकत आणलेला असल्याची माहिती दिली. या माहितीचे आधारे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर-लाकड्या हनुमान गाव येथून आरोपी सुनिल उर्फ लोका दिलीप खजन उर्फ पावरा वय 20 यालादेखील अटक करण्यात आली आहे. शिरपूर परिसरातील लोक जंगली भागात गांजाचे उत्पादन घेत असतात, अशी माहिती त्यांनी दिली असून गांजा अटक आरोपी मयुर जडाकर व अखिलेश धुळप हे शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षितांना विकत असावेत, असा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.