30 सप्टेंबरपर्यंत मिळणार धान्य
पनवेल ः वार्ताहर
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत मोफत तांदूळ व गव्हाचे वाटप करण्यात येते. सदर योजनेची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार होती, परंतु त्याला केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता गरीब लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 पर्यंत धान्य मिळेल. त्यामुळे महागाईच्या चटक्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांना त्याचा फायदा मिळेल.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनामार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मार्च-एप्रिल 2020 पासून मोफतचे धान्य देण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांना मे व जून 2021 मध्ये मोफत धान्य वाटपाची योजना जाहीर केली होती. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गरीबांसाठीच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची व्याप्ती जुलै ते नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविली होती. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक कुटुंबातील प्रति व्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
सुरुवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती. नंतर योजनेला 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये या योजनेचा कालावधी संपुष्टात येणार होता. या योजनेला पुन्हा मुदतवाढ मिळणार नसल्याची चर्चा सुरू होती, मात्र गरिबांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या योजनेला मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.