Breaking News

गुंतवणूकदारांचे तीन प्रकार.. तुम्ही कोणत्या गटात आहात?

सध्याच्या बाजारात अनेकजण गोंधळलेले दिसत आहेत. मागील दोन वर्षांत ’झट मंगनी पट शादी’ची सवय लागली असल्याने घेतलेले शेअर्स सांभाळणे हे जिकिरीचं वाटू लागलंय. साधारणपणे वर्गवारी केल्यास अशा गुंतवणूकदारांचे खालीलप्रमाणे तीन गटात वर्गीकरण करता येईल.

1) भावनिक

हे लोक केवळ पैसे गुंतवूनकरुन थांबत नाहीत तर त्यांचसोबत आपल्या भावनाही गुंतवतात. शेअरबाजाराच्या चढउताराप्रमाणं यांच्या भावनेमध्येही चढउतार येतो. गुंतवणूक मूल्य वाढलं तर अजून गुंतवणूक करायसाठी धडपडतात किंवा ती केली नसल्यास चरफडतात आणि उलट केलेल्या गुंतवणुकीचं मूल्य कमी झाले तर चरफडत नुकसान सोसून पैसे काढून घेतात, आणि मग शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंङ हे कसे वाईट हे इतरांना सांगत राहतात. हा एक मोठा स्वभावदोष असून तो तुम्हाला भांडवलवृद्धी करण्यापासून वंचित ठेवतो. चांगल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीनं यांवर मात करता येणं शक्य आहे. पण हीच व्यक्ती जर चुकीच्या माणसाकडं गेली तर ? तर मात्र त्याच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेऊन तो अशा लोकांना त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी सहज गंडवू शकतो.

2) असमंजस

अशी व्यक्ती कायम ’क्या करे क्या ना करे’ वाल्या मोडमध्ये असतात. यांची व्हिजन कधीच साफ नसते, म्हणजेच दूरदृष्टीपणा नसतोच. आपण नेमकी कुठे आणि कशाकरता गुंतवणूक करत आहोत हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. आपला निर्णय बरोबर आहे की चुकला, याची सतत पङताळणी हे गोंधळलेले लोक करत असतात. खूप विचार करुन निर्णय घेतल्यावर सुद्धा आपला निर्णय चुकला आहे असं यांना सतत वाटत राहतं. या लोकांना ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे या कुणावरही विश्वास दाखवत नाही. अगदी स्वत:वर सुद्धा… मध्येच 10 वर्षांसाठी म्हणून म्युच्युअल फंडात एखादी एसआयपी सुरु करतील आणि  काही दिवसांनी बंद देखील करतील, असं यांचं चाललेलं असतं. हे लोक गुंतवणूक सल्लागाराला पण विचलीत करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने विचारुन भंडावून सोङतात, त्याचं उत्तर मिळालं की त्यांच्या मनांत अनेक उपप्रश्न तयार होतात. कसेबसे मग उपकार केल्यासारखं सल्लागारावर थोडासा विश्वास ठेऊन आणि संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकून ही मंडळी गुंतवणूक करतात पण काही दिवसानंतर लगेच त्यांना परत झटका येऊन ते परस्पर काहीतरी विचित्र निर्णय घेऊन स्वत:च्याच भांङवलवृद्धीला हरताळ फासतात आणि नावं मात्र सल्लागाराला ठेवतात. यांचा सर्वांत मोठा ’शत्रू’ दुसरं कोणी नसून हे स्वत:च असतात. कित्येक अनुभवानंतरही यांच्या स्वभावात बदल होत नाही. एकच चूक परत परत करण्यात अशांचा हातखंङा असतो, एका अर्थानं प्रचंङ चंचलबुद्धीचे ते स्वामी असतात. कधी इक्विटी फंडात गुंतवणूक कर, तर तिथून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक कर, लगेचच त्यातून काढून मध्येच शेअर्समध्ये गुंतव आणि मग तिथून काढून घेऊन जमिनीमध्ये गुंतवणूक कर अशा फेर्यांकत यांचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं, पण यांच्या हाताला शेवटपर्यंत कुठेच काही लागत नाही. हे लोक कुठुनही कधीच पैसे कमावू शकत नाही. असे लोक स्वत:च्या दुटप्पी धोरणामुळं स्वतःची संपत्ती कधीच बनवू  शकत नाहीत.

3) शांत व संयमी

या व्यक्ती गुंतवणूक करतानांच आपण का? कोठे? कशाकरीता? किती कालावधीसाठी? गुंतवणूक करत आहोत याचा सारासार विचार करतात. गुंतवणुकीत नेमकी किती जोखीम आहे? आणि आपल्याला नेमका किती परतावा मिळू शकतो यांचा आढावा घेऊन, उज्वल भविष्याच्या दृष्टीनं हे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात. हे देखील सल्लागारास अनेक प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचं निरसन करतात आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाल्यास ते सल्लागारावर पूर्ण विश्वास दाखवून गुंतवणूक करतात. शेअरबाजारात सुरुवातीलाच चांगला फायदा झाला तरी ते आनंद व्यक्त करत नाही किंवा शेअरबाजार खाली गेला तरी नुकसान बघून हे लोक विचलीत होत नाहीत. आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचेपर्यंत हे लोक कोठेच थांबत नाहीत कारण, आपण नेमकं काय करत आहोत याचं त्यांना चांगलं भान असतं. समुद्राच्या तळाशी असणार्यात शांत प्रवाहासारखा यांचा स्वभाव असतो. इतिहास साक्षीला आहे, की शेअरबाजारात कागदांवर दिसणारा परतावा या लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये देखील आढळून येतो.

या लोकांकडून सल्लागाराला देखील खूप काही शिकायला मिळतं. एक चांगला गुंतवणुकदार कसा असावा याचा आदर्शपाठ म्हणून यांच्याकडं बघितलं जातं. सल्लागांराच्या नजरेत यांची फार ’इज्जत’ असते.

या 3 मध्ये आपण कुठल्या वर्गवारीत येता..? हे तपासून बघा, गरज असेल तर आपल्या स्वभावांत बदल करा, कारण आपण ’भारताच्या विकसनशील ते विकसीत राष्ट्र’ या विशिष्ट काळांत गुंतवणूक प्रवास करत आहोत. ‘रस्ते कभी गलत नहीं होते, बस हम भटक जाते है’। इथे भटकलात, तर ही संधी पुन्हा मिळणार नाही. तुमच्या स्वभावामुळे तुम्ही तुमचेच नाही तर सोबत कुटुंबाचं भविष्यही पणाला लावत आहात हे विसरु नका.

गुंतवणूक का करावी ? ती कोठे करावी ? ती कोठे करू नये.. गुंतवणूक कशी करावी ? गुंतवणूक कधी करावी ? गुंतवणूक किती करावी ? या सर्वच बाबींना फारच महत्त्व आहे आणि यांची उत्तरं व त्यानुसार शंकांचं निरसन करून योग्य गुंतवणूक साधनांद्वारे दूरदृष्टी ठेवून योग्य प्रकारे गुंतवणूक करणं हे तुमच्या गुंतवणूक सल्लागाराद्वारेच होऊ शकते. आपल्या स्वतःच्या गरजा समजून घेणं आणि त्यानंतर गुंतवणूकीची निती आखणे आवश्यक आहे.. बघा पटतंय का..?

-प्रसाद भावे, अर्थप्रहर

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply