पनवेल : रामप्रहर वृत्त
टाटा स्टील बीएसएलने रायगड जिल्ह्यातील खोपोली, सावरोली येथील आपल्या कारखान्याच्या जवळपासच्या गावांमधील महिलांना मदत करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरु केला आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने टाटा स्टील बीएसएलने ’महिला सबलीकरण आणि उद्यमशीलता’ उपक्रम हाती घेतला आहे. टाटा स्टीलच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेस विभागाचे उपाध्यक्ष चाणक्य चौधरी यांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी कॉर्पोरेट सर्व्हिसेस विभागाचे प्रमुख मणिकांत नाईक, खोपोली आणि होसूर प्लान्टस्चे कार्यकारी प्लान्टप्रमुख कपिल मोदी हे टाटा स्टील बीएसएलचे वरिष्ठ अधिकारी, सावरोलीच्या सरपंच प्राची लाड, तसेच या उपक्रमातील अंमलबजावणी भागीदार असलेल्या अहमदनगरच्या वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या (डब्ल्युओटीआर) प्रीती लता आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील सावरोली, निफन देवन्हावे, दहिवली आणि सांगडेवाडी या पाच गावातील 1580 महिलांसहीत 3400 पेक्षा जास्त लोकांना या उपक्रमाचे लाभ मिळणार आहेत. या उपक्रमाला पीआरआय सदस्य आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहयोगाबद्दल त्यांचे आभार मानताना चाणक्य चौधरी यांनी सांगितले की, तब्बल 46 टक्के महिला लोकसंख्या असलेल्या या पाच गावांमध्ये महिला सबलीकरण उपक्रमाची सुरुवात हे टाटा स्टील बीएसएलने उचललेले एक लक्षणीय पाऊल आहे. आमच्या कारखान्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सर्वसमावेशक प्रगती घडून यावी यासाठी इतर क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवण्याची आमची परंपरा भविष्यातही कायम राखली जाईल.
धोरणात्मक सहयोगावरही भर
औपचारिक आणि सक्रिय स्वयंसहाय्यता गट स्थापन करून या गावांमधील महिलांचा सामाजिक-आर्थिक विकास घडवून आणणे, सूक्ष्म उद्यम उभारून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या संधी निर्माण करणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि गर्भवती महिला तसेच मातांच्या आरोग्याची नीट काळजी घेऊन एकंदरीत समाजाच्या आरोग्यात सुधारणा घडवून आणणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्देश आहेत. ग्रामपंचायत आणि सरकारच्या आरोग्य, आयसीडीएस आणि रोजगार विभागांसोबत धोरणात्मक सहयोगावर देखील या उपक्रमामध्ये भर दिला जाईल.