ग्रामस्थांसह शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
पाली ः प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पडसरे गावाजवळील पुलाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. पडसरे गावासह, लोळगेवाडी, एकलघर व अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला जोडणारा हा एकमेव पूल आहे. पुलावरून ग्रामस्थांसह आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी येथून ये -जा करतात. पावसाळ्यात पूल अचानक ढासळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी श्री दत्तगुरु ग्रामस्थ मंडळ पडसरे यांच्यातर्फे महागाव सरपंचांना पूल दुरूस्तीसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. पडसरे आश्रमशाळेत सुधागडसह इतर तालुक्यातील 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या पुलावरून सतत ये -जा सुरू असते. शिवाय गावकरी व आश्रमशाळेतील कर्मचारी वर्ग दैनंदिन गरजेसाठी लागणार्या साहित्याची ने -आणसुद्धा या पुलावरून करतात. या पुलाखालून मोठा धबधबा वाहतो. पुलाची सध्याची दूरवस्था झाली असल्याने पावसाळ्यात प्रचंड रौद्ररूप धारण करणार्या धबधब्याच्या प्रवाहात हा पूल किती तग धरेल याची चिंता ग्रामस्थ, आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी-पालकांना भेडसावत आहे. त्यामुळे या पुलाची दुरूस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे.
पूल नव्याने उभारण्याची गरज
या पुलाच्या प्लास्टरमधून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत तर काही खाली कोसळल्यादेखील आहेत. पुलाचे संरक्षक कठडे तुटले आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले आहे. सर्वत्र गवताचे आच्छादन आहे. त्यामुळे पूल नव्याने उभारण्याची गरज आहे.