उरण ः वार्ताहर
तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात शुक्रवार (दि. 22) बैठक पार पडली. या वेळी नवनियुक्त समितीचे अध्यक्ष मनोज वासुदेव भगत व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजनांबाबत नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी माहिती दिली. बैठकीला नायब तहसीलदार संदीप खोमणे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मनोज भगत, सदस्य भावना म्हात्रे, आरती चोगले, यशवंत घरत, सुनील तांडेल, समाधान म्हात्रे उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदानयोजना समितीसमोर एकूण 34 प्रकरणे ठेवण्यात आली होती. संजय गांधी निराधार योजनेची एकूण 29 प्रकरणे त्यापैकी17 प्रकरणे परिपूर्ण असून 12 प्रकारांमध्ये काही कागदपात्रांची पूर्तता नसल्याने त्या बाबत पूर्तता करून घेऊन मंजूर करण्यात येतील. श्रावणबाळ निराधार योजनेची एकूण 5 प्रकरणे असून त्यापैकी 2 प्रकरणे परिपूर्ण आहेत. उर्वरित 3 प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन मंजूर करावीत असे ठरविण्यात आले.