Tuesday , February 7 2023

नराधमांचा एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस गोळीबारात ठार

हैदराबाद : वृत्तसंस्था

हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 6) मध्यरात्री 3 ते 6च्या दरम्यान घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली.

हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार व तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी अधिक तपासासाठी चारही आरोपींना रात्री घटनास्थळी नेले होते. या वेळी आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते न थांबल्याने पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात ते ठार झाले. याबाबत तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले की, आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनीही गोळ्या झाडल्या.

शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरिफ अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी नेले. ही घटना नेमकी कशी घडली हे पोलिसांना तपासायचे होते, परंतु या दरम्यान चौघेही पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आवाहनाला दाद देत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार 27 नोव्हेंबरच्या रात्री महिला डॉक्टरचे ट्रकचालक व त्याच्या साथीदारांनी अपहरण केले. आरोपी हे तरुणीला निर्जनस्थळी घेऊन गेले आणि तिला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एका आरोपीने तिचे तोंड व नाक दाबून तिचा जीव घेतला. यानंतर तिथून 25 किमी अंतरावर जाऊन पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्यात आला होता.

बहुचर्चित प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर बहुतांश लोकांनी या कृत्याचे समर्थन केले, तर काहींनी मात्र या पद्धतीबाबत नापसंती व संशय व्यक्त केला आहे.

Check Also

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया …

Leave a Reply