रेवदंडा : प्रतिनिधी
येथील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावातील अनेक वास्तू, चर्च आजही पोर्तुगीज काळाची साक्ष देत आहेत. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस‘ हा चर्चसुध्दा त्या काळाचा साक्षीदार असून, या प्रार्थना स्थळात ख्रिस्ती बांधव श्रध्दा व भक्तीने विविध उत्सव साजरे करतात. प्रतिवर्षी 5 मे रोजी ‘माय दे देऊस‘ उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो.
रेवदंड्यांतील गोळा स्टॉपनजीकच असलेले ‘माय दे देऊस‘ चर्च ख्रिस्ती बांधवासह सर्व धर्मियाचे श्रध्दास्थान आहे. चर्चला पत्र्याचे छप्पर असून, कार्यक्रमासाठी उजव्या बाजूला मोकळी जागा आहे. तेथेच छोटेखानी व्यासपिठ आहे. समोरील बाजूस विहीर असून, ही नवसाला पावणारी तसेच चमत्कार घडविणारी माऊली आहे, असे सांगितले जाते. वसई, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणाहून भाविक, विशेषतः ख्रिस्ती बांधव 5मे रोजी ‘माय दे देऊस‘ चर्चमध्ये येतात. रविवार व बुधवार या दिवशीही भाविक येथ पुजाअर्चेेसाठी येत असतात. हनी आयझॅक शहापुरकर हे चर्चमध्ये नित्याने मेणबत्ती व पुजाअर्चा करीत असतात.
प्रतिवर्षी पाच मे रोजी येथील चर्चमध्ये उत्सव साजरा करण्यात येतो. त्या आधी नऊ दिवस सायकांळी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थना करतात. या नऊ दिवसात ख्रिस्ती बांधव कोर्लई ते रेवदंडा असा पायी प्रवास करतात. 5 मे रोजी देश विदेशातील ख्रिस्ती बांधव ‘माय दे देऊस‘ उत्सवासाठी रेवदंड्यात येतात. सकाळी रेवदंडा गावातून पालखी काढण्यात येते, त्यात ख्रिस्ती बांधवांचा सहभाग असतो. या पालखीस हिंदु बांधवांतर्फे श्रीफळ अर्पण केला जातो.
चर्चचा इतिहास
अहमदनगरच्या बुरहान निजामशहाने सन 1516 मध्ये पोर्तुगिजांना वखार बांधण्यास तसेच चौल बंदरात वावर करण्याची परवानगी दिली. सन 1521 मध्ये विजापुरच्या आरमाराने चौल जाळले व पोर्तुगिजांचा पराभव केला. तरीही बुरहानने पोर्तुगिजांशी मैत्री कायम ठेवली आणि लोअर चौल (रेवदंडा) येथे किल्ला बांधण्यास परवानगी दिली. चौलचे तत्कालीन प्रांताधिकारी शेख मुहम्मद यांने विश्वासघात केल्याने दिवचे तत्कालीन प्रांताधिकारी मलिक यांनी खाडीच्या पलिकडे तिन महिने मुक्काम ठोकला आणि आगरकोट किल्ला बांधण्यास अडथळा आणला. सन 1524 मध्ये आगरकोट किल्लाचे बांधकाम पुर्ण झाले. या आगरकोट किल्ल्यात सातखणी, तसेच पोर्तुगिजांनी आठ चर्च बांधले. त्यापैकीच ‘माय दे देऊस‘ चर्च असून तो आजही भक्कमपणे उभा आहे.