Breaking News

नवी मुंबईतील 1,418 कंत्राटी आरोग्यसेवक कार्यमुक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना काळात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महापालिकेने एक हजार 911 जणांची तात्पुरती भरती केली होती, परंतु आता यातील आतापर्यंत 1,418 जणांना कार्यमुक्त करून केवळ 493 जणांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई शहरात दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला पालिकेच्या वाशी रुग्णालयात कोरोना उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने सिडको प्रदर्शनी केंद्र येथे 1200 खाटांचे जम्बो कोरोना उपचार केंद्र सुरू केले. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये पालिकेने मोठ्या प्रमाणात तात्पुरती आरोग्यसेवकांची भरती केली होती. यामध्ये एमडी, एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध प्रकारांतील एक हजार 911 जणांची तात्पुरती भरती केली होती. शहरभर राबवण्यात येत असलेल्या लसीकरणासाठीही या तात्पुरत्या वैद्यकीय कर्मचार्‍यांची पालिकेला मदत होत आहे, परंतु शहरात कोरोनाची स्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. त्याप्रमाणे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही अत्यल्प आहे. त्यामुळे यातील एक हजार 911 जणांमधील 493 जणांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

आवश्यकता भासल्यास निर्णय घेणार

सध्या नवी मुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्याने बहुतांश जणांना कमी करण्यात आले आहे. पुन्हा आवश्यकता वाटल्यास योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना काळाव्यतिरिक्त असलेल्या मानधनामध्ये मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply