Breaking News

सिद्धिविनायक मंदिर समितीचा प्रश्न चिघळणार

आगरी समाजाचा आंदोलनाचा एल्गार

पेण ः प्रतिनिधी

मुंबई प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे आगरी समाजाच्या देऊबाई पाटील यांनी 1801 साली बांधलेले असताना या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर याच आगरी समाजाला डावलून परस्पर परप्रांतीयांना स्थान दिले जात आहे. याविरोधात आता आगरी समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. 25) मुंबईतील शिवडी येथील आगरी समाज मंदिराच्या सभागृहात झालेल्या समाज बांधवांच्या सभेत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 40-42 वर्षांपासून सर्व समाज घटकांना व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे, परंतु एकट्या आगरी समाजाला डावलले गेले आहे. याबद्दल समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. यापुढे असे घडू देणार नाही असा ठाम निर्धार या सभेत करण्यात आला. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने यासंदर्भातल्या जनभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 14 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे कळविल्या होत्या, पण त्याची कसलीही दखल न घेता 22 जानेवारी 2021 रोजी नवी व्यवस्थापन समिती नियुक्त केली, मात्र त्यावर समाजाचा एकही प्रतिनिधी न घेता उलट 29 सप्टेंबर 2021 रोजी राज्य सरकारने ही व्यवस्थापन समिती तीन वर्षांसाठी नियुक्त केल्याचे कळविले आहे, पण ही मुदत संपल्यानंतरच्या नियुक्तीमध्ये आगरी समाजाला प्रतिनिधित्व देणार असल्याचेही आश्वासन दिलेले नाही. यामुळे समाजात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवडी-मुंबई येथे झालेल्या सभेत मुंबईचे नागरिक, मूळनिवासी असलेल्या आगरी समाजाला दुर्लक्षित करणार्‍या, त्याला सापत्न वागणूक देणार्‍या राज्यकर्त्यांच्या पक्षपाती भूमिकेवर कडाडून टीका करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष गजानन म्हात्रे, मुंबईचे माजी नगरसेवक रघुनाथ थवई, डॉ. सिद्धार्थ पाटील, प्रवीणचंद्र पाटील, सचिव मंगेश कडू, निवृत्त पोलीस निरीक्षक गोपी पाटील, अलिबाग शाखाध्यक्ष राजेंद्र वाघ, सुभाष गावंड, चंद्रशेखर म्हात्रे, शाम पाटील, कृष्णा घोगरे, अशोक म्हात्रे, विनोद देवळे, गजानन भोईर, गणेश म्हात्रे, विधाता ठाकूर, धुरंधर मढवी, जयेश म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply