Breaking News

बोडणी येथील खुन्याला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी

पैशाच्या वादावरून लोखंडी हातोड्याने सहकार्‍याला ठार मारणार्‍या आरोपीला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप तसेच पैसे चोरल्याप्रकरणी सात वर्षे सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.

संजयकुमार भारतीप्रसाद मेस्त्री (वय 19) असे मृत इसमाचे नाव होते. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील रविासी होता. सध्या बोडणी येथे कामानिमित्त राहत होता. त्याचठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा सहकारी आरोपी नरेंद्रसिंह उत्तमसिंह गोयल (वय 30, मूळ रा. उत्तरप्रदेश) हादेखील राहत होता. 21 जानेवारी 2018 रोजी रात्री 9-00 वाजण्याच्या सुमारास राहात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पैशावरून दोघांमध्ये वाद झाला होता. आरोपी गोयल याने रागाच्या भरात लोखंडी हातोड्याने संजयकुमार मेस्त्री याच्या डोक्यावर वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने तेथून 40 हजार रुपये घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय निघोट, मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, पोलीस हवालदार गायकवाड आदींंनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक फौजदार दीपक गायकवाड, पोलीस हवालदार विनोद जाधव,  संदेश ठाकूर, प्रदीप झेमसे, पोलीस नाईक मंगेश लांगी, पोलीस शिपाई विलास चव्हाण यांचे एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने उत्तरप्रदेश येथील उदीमोड येथून आरोपीला ताब्यात घेतले. अवघ्या दहा दिवसात तपास पूर्ण करून आरोपी नरेंद्रसिंहविरोधात  सत्र न्यायालयात  दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. वाघवसे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे शासकिय अभियोक्ता अ‍ॅड. अमित महेश्वर देशमुख यांनी एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये साक्षीदार लक्ष्मी कोळी व म्हाळसाकांत नाखवा तसेच पंच साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी अजय इंगळे यांची साक्ष महत्वाची ठरली. अ‍ॅड. अमित देशमुख यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शुक्रवारी (दि. 3) आरोपी नरेंद्रसिंह उत्तमसिंह गोयल याला भा.दं.वि. कलम 302 खाली दोषी ठरवून जन्मठेप तसेच भा.दं.वि. कलम 397 खाली दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply