प्रतापगड ः वृत्तसंस्था
मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रतापगडमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
समाजवादी पक्षाने युतीच्या नावाखाली मायावती यांच्या बसपाचा फायदा घेतल्याची गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली. काँग्रेस आणि सपाने मायावतींचा लाभ घेतला. त्यामुळे मायावती आता जाहीर सभांमधून काँग्रेसवर टीका करताना दिसत असल्याचे मोदींनी सांगितले.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मत चोरणारा पक्ष असण्याचा आरोप केला, तसेच कॅबिनेटचे अध्यादेश फाडणारा पक्ष लोकशाहीला जागेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसला मला संपवायचे आहे. त्यासाठी ते कारस्थानेही रचत आहेत, पण माझी 50 वर्षांची तपस्या खरंच इतक्या सहजासहजी संपवणे शक्य होणार नाही. मी 50 वर्षे अविरतपणे काम केले आहे. न थकता, न थांबता देशासाठी झटलो आहे. तेव्हा मी स्वत:ही पडणार नाही आणि पक्षालाही पडू देणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, तसेच काँग्रेसचे संपूर्ण लक्ष माझी प्रतिमा खराब करण्यावर आहे, असा आरोपही मोदींनी या वेळी केला.