अलिबाग : प्रतिनिधी
स्व. सिकंदर केळकर मित्रमंडळ, रायगड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्व. सिकंदर केळकर स्मृतीचषक जिल्हास्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जे. एस. डोलवी संघाने विजेतेपद पटकावले. स्टार रिवाईडन धाटाव संघ उपविजेता ठरला. खुशबू आयस्क्रीम अलिबाग संघाने तृतीय तर युवराज स्पोर्ट्स वायशेत संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्व. सिकंदर केळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलाच्या शैक्षणिक मदतीसाठी अलिबाग तालुक्यातील बांधण येथे स्व. सिकंदर केळकर मित्रमंडळ रायगड यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जे. एस. डब्ल्यू. संघाचा राज पाटील स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला. युवराज स्पोर्ट्सचा स्वप्नील वेळे पब्लिक हिरो ठरला. स्टार रिवाईडनचा अजय मोरे याला उत्कृष्ट चढाईचे तर जे. एस. डब्ल्यूचा सुचित पाटील याला उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक देण्यात आले. स्व. सिकंदर केळकर यांचे कबड्डीतील मित्र, राजकीय पुढारी, कबड्डी प्रेमी व गामस्थांनी या स्पर्धेसाठी आर्थिक हातभार लावला. स्पर्धेतून जमा झालेला निधी स्व. सिकंदर केळकर यांच्या पत्नीकडे देण्यात आला. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने देखील आर्थिक दिली. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे स्वप्नील शिंदे, संजय पोइलकर यांनी सिकंदर केळकर यांना श्रध्दांजली वाहिली. वसंत भोईर, रोहित पाटील, सागर थळे यांनी श्रद्धांजली गीत सादर केले. सर्व राजकीय पक्षांचे नेते, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, प्रो कबड्डी खळाडू, छत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू यांनी या स्पर्धेस भेट दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्व. सिकंदर केळकर मित्रमंडळ रायगडला महिंंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.