नागोठणे : प्रतिनिधी
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 10) नागोठण्यात येऊन पूरबाधित भागाची पाहणी केली. पुराचे पाणी शिरलेल्या सर्व घरांचे, तसेच दुकाने, टपरी यांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत, असे आदेश पालकमंत्र्यांनी या वेळी उपस्थित अधिकार्यांना दिले. या पाहणी दौर्यात माजी मंत्री रवीशेठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, माजी जि. प. सदस्य मारुती देवरे, संजय कोनकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, मोरेश्वर म्हात्रे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, शिवसेना शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, शेखर गोळे, रऊफ कडवेकर, फातिमा सय्यद, सिराज पानसरे, रामचंद्र देवरे, सुभाष पाटील, परशुराम तेलंगे, योगेश म्हात्रे, विनोद अंबाडे आदी सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांनी अंबा नदीवर असलेल्या चारशे वर्षांपूर्वीच्या पुलाची पाहणी केली. या वेळी कोकणरत्न पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी केली. ना. चव्हाण यांनी शहरातील पूरबाधित भागाची पाहणी करताना सचिन मोरे आणि प्रशांत मोरे यांच्या गणपती कारखान्यांना आवर्जून भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
तत्पूर्वी ना. चव्हाण यांनी रोहे शहराला भेट दिल्यानंतर नागोठण्यात येत असताना अलीकडेच येथील अंबा नदीत पडून वाहून गेलेल्या वरवठणे गावातील संतोष गंडले यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. नागोठण्यानंतर पालकमंत्र्यांनी विभागातील बेणसे, शिहू, चोळे, गांधे, झोतीरपाडा आदी गावांना भेट दिली.