खोपोली : प्रतिनिधी
शहरातील विरेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या अनेक वर्षापासून गणेश विसर्जन केले जात होते. त्याच तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे तलावातील पाणी प्रदुषण रोखण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी त्यांनी कृत्रिम तलाव आणि मोबाइल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. खोपोली शहर पर्यावरणमुक्त करण्यासाठी या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा, असे आवाहन प्रशासक अनुप दुरे आणि पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांनी केले आहे.
खोपोली शहरात साडेतीन हजाराच्या आसपास घरगुती गणपती तर 37 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. यामधील बहुसंख्य गणेश मुर्तींचे विसर्जन वरच्या खोपोलीतील विरेश्वर तलावात केले जाते. या वेळी हार, फुले, निर्माल्यही पाण्यात टाकले जाते. त्यामुळे तलावातील पाणी प्रदुषीत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरपालिके तर्फे दरवर्षी रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील क्लबच्या मदतीने कृत्रिम तलावात गणेशमुर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाते.
या वेळी नगरपालिकेचे प्रशासक अनुप दुरे यांनी खोपोली शहरातील कारमेल स्कूल, नेहरू गार्डन शास्त्री नगर, शिळफाटा हनुमान मंदिर, विरेश्वर तलाव या ठिकाणी मोठ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच शिळफाटा, शास्त्री नगर, काटरंग, खोपोली बाजारपेठ परिसरात फिरत्या मोबाइल कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. प्रशासक अनुप दुरे, पोलीस निरीक्षक शिरिष पवार, सहाय्यक निरीक्षक हरेष कळसेकर यांनी शहरातील सर्व विसर्जन घाट, रस्ते, विद्युत व्यवस्था यांची पाहणी केली. त्यांना रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष शिवम महाबरी, पालिकेचे अधिकारी गजानन जाधव, अग्निशमन दलाचे प्रमुख हरी सुर्यवंशी, आरोग्य विभागाचे वैभव ओव्हाळ यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजीक संस्थेचे कार्यकर्ते मदत करीत आहेत.
नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे गणेशमुर्ती विसर्जनाची व्यवस्था केली असून, भाविकांनी फिरते कृत्रिम तलाव किंवा विसर्जन घाटासमोरील कृत्रिम तलावात गणेशमुर्तींचे विसर्जन करून खोपोली शहरातील प्रदुषण टाळावे.
-अनुप दुरे, प्रशासक, खोपोली नगर परिषद
RamPrahar – The Panvel Daily Paper