मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे पाच, तर शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 20 जूनला मतदान होणार आहे.
भाजपकडून विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपच्या पाठिंब्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
शिवसेनेने सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना, राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना, तर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी डमी अर्ज दाखल केला होता.
पाचवी जागा जिंकणार -देवेंद्र फडणवीस
मुंबई ः सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा आम्हाला विधान परिषद निवडणुकीत होईल. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही जागा निवडून आणू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, सत्तारूढ पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रयत्न होता, मात्र काँग्रेसने उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे ही निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याने ही निवडणूक लादली गेली.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …