Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे होणार लोकार्पण

पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि. 14) महाराष्ट्र दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. देहूतील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून शिळा मंदिर साकारण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी दोन तास देहू परिसरात असणार आहेत. दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधानांचे लोहगाव विमानतळावर आगमन होईल. 1 वाजून 45 मिनिटांनी ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान परिसरात दाखल होतील. या ठिकाणी संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल. 2 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान सभेच्या ठिकाणी दाखल होतील. सभामंडपात वारकरी, उपस्थित भाविकांशी ते संवाद साधणार आहेत. 20 जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकर्‍यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
देहू येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील. त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहतील.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply