उरण : वार्ताहर : मुंबई ही हाकेच्या अंतरावर असल्याने (उरण) मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी उरणकर हे जलप्रवास सुखकर असल्याने बोटीने ये-जा करतात. उरण मोरा बंदर ते भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी जलप्रवासास अवघे 40 ते 50 मिनिटे लागतात. उरण ते भाऊचा धक्का जलप्रवासास एकेरी भाड्यास 55 रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. दररोज शेकडो प्रवासी जलमार्गाने प्रवास करीत असतात, परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. मोरा बंदर हे विविध समस्यांनी ग्रासले असून समस्यांचे माहेरघर म्हणण्याची वेळ आली आहे. मोरा बंदरावर दिव्यांचे खांब आहेत, परंतु अनेक दिवे बंद स्वरूपात आहेत. पाणी पिण्याची सोय केली आहे, परंतु नळाला पाणीच नाही व नळसुद्धा गायब आहेत, पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी शौचालय आहे, परंतु ते कित्येक वर्ष बंद स्वरूपात आहे. त्यांना टाळे लावलेले आहेत. शौचालयासमोर कमालीचा कचरा साचलेला आहे. स्वच्छता केली जात नाही. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड बंदर निरीक्षक कार्यालय नेहमीच बंद असते, तर प्रवाशांनी समस्या कुणाला सांगायच्या हा प्रश्न पडला आहे. संबंधित अधिकार्यांनी या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …